नवापूर तालुक्यात ५०० कोटींची गुंतवणूक

jalgaon-digital
2 Min Read

नंदुरबार |प्रतिनिधी NANDURBAR

जिल्ह्यातील नवापूर (Navapur) येथील (midc) औद्योगिक परिसरात उद्योग उभारण्यासाठी (Polyfilm) पॉलीफिल्म प्रा.लि. कंपनीने पुढाकार घेतला असून सुमारे पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. या उद्योगामुळे सुमारे दोन हजार बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

नवापूर येथे उद्योग उभारण्यासाठी पॉलीफिल्म प्रा.लि. कंपनीने सुमारे पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या कंपनीला आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची तयारी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने केली आहे.

लगतच्या सुरत परिसरातील अनेक उद्योगांनी नवापूर येथे उद्योग विस्तार करण्यात स्वारस्य दाखविले आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ संचालकांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

इव्ही चार्जिंग स्टेशनसाठी प्राधान्याने भूखंड, वीजेवर चालणार्‍या वाहनांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एमआयडीसीकडून भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दुचाकी तसेच चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी भूखंड उपयुक्त ठरेल.

राज्य शासनाने अलिकडेच घोषित केलेल्या ईव्ही धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्धार असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नवापूर तालुक्यात औद्योगिक परिक्षेत्रात मोठे उद्योग आल्यास येथील आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

नंदुरबार जिल्ह्यात औद्योगिक परिक्षेत्रात कमी गुंतवणूकीमुळे रोजगाराच्या संधी कमी असल्याने येथील नागरिकांना रोजगारासाठी परराज्यात स्थलांतरीत व्हावे लागते. मात्र, या नव्या कंपनीमुळे सुमारे २ हजार बेरोजगार तरुणांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध होणार असल्याने स्थलांतराचा प्रश्‍न काहीसा मिटण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *