Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedफाईव्ह जी खरचं धोकादायक आहे?

फाईव्ह जी खरचं धोकादायक आहे?

श्रीशा वागळे

आता आपण सर्वजण फाईव्ह जीच्या उंबरठ्यावर उभे ठाकलो आहोत. फाईव्ह जीमुळे इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार आहे. बाजारात फाईव्ह जी फोनही येऊ लागले आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचा अवलंब करताना होणारा किरणोत्सर्ग मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अभिनेत्री जुही चावलानेही फाईव्ह जीविरोधात अलीकडे याचिका दाखल केली होती. यानिमित्ताने घेतलेला या प्रश्नाचा हा वेध.

- Advertisement -

अभिनेत्री जुही चावलाने दाखल केलेल्या आणि फेटाळल्या गेलेल्या याचिकेमुळे फाईव्ह जी तंत्रज्ञान पुन्हा एकदा चर्चेत आले. आपल्या देशात फाईव्ह जी तंत्रज्ञानाच्या चाचण्यांना हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. पुढील सहा ते आठ महिन्यांमध्ये फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा वापर सुरू होण्याची शक्यता आहे. बाजारात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने युक्त फोन उपलब्ध झाले आहेत. फाईव्ह जीमुळे इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार यात शंका नाही. मात्र हे तंत्रज्ञान मानवीच नाही तर पशुपक्षी आणि अन्य सजीवांच्या आरोग्यासाठी धोकादायक असण्याबाबतच्या शंकांचे निरसन अद्याप झालेले नाही.

फाईव्ह जीमुळे तंत्रज्ञान, पर्यायाने मानवी आयुष्य वेगळी उंची गाठणार असले तरी त्याच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा अवलंब करताना वापरल्या जाणार्‍या प्रणालीतून होणारा किरणोत्सर्ग मानवी आरोग्य धोक्यात आणू शकतो, हा विचार मांडला जात असल्यामुळे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले जात आहे.

अभिनेत्री जुही चावलाने दाखल केलेल्या याचिकेत फाईव्ह जी तंत्रज्ञान तसेच कमी तीव्रतेच्या रेडिओफ्रिक्वेन्सी (आरएफ) इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक फिल्ड (ईएमएफ) मुळे होणार्‍या किरणोत्सर्गाच्या मानवी आरोग्य तसेच पर्यावरणावर होणार्‍या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अर्थात, फाईव्ह जी तंत्रज्ञानाबाबत अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करणारी जुही ही पहिलीच व्यक्ती नाही. फाईव्ह जी तंत्रज्ञानाचे मानवी आरोग्य तसेच पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम अद्याप शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले नसले तरी याआधी अनेक शास्त्रज्ञांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

आपण तांत्रिक प्रगती आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या विरोधात नाही. मात्र वायरलेस उपकरणांचा वापर करताना अशा उपकरणांमधून तसेच या तंत्रज्ञानाचा पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणार्‍या टॉवर्समधून होणार्‍या किरणोत्सर्गाबाबत मनात शंका उपस्थित होत असतात, असेही जुहीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. हे तंत्रज्ञान मानवी आरोग्यासह पशुपक्षी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित असल्याची खात्री संबंधित विभागाने करून दिल्यानंतरच त्याचा अवलंब करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

फाईव्ह जीमुळे इंटरनेट वापरात आमूलाग्र बदल होणे अपेक्षित आहे. फाईव्ह जी ही इंटरनेट जगतातली क्रांती आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञान फोर जीपेक्षा प्रचंड प्रगत असून यामुळे वापरकर्त्यांना वेगळाच अनुभव मिळणार आहे. फाईव्ह जीमुळे स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणार्‍या इंटरनेटचा वेग वाढणारच आहे शिवाय आपली घरे आणि गाड्या अधिक स्मार्ट व्हायला मदत होणार आहे. इतकेच नाही तर ओटीटी व्यासपीठे अधिक चांगल्या पद्धतीने सादरीकरण करू शकतील. भारतात हे तंत्रज्ञान अंमलात आले नसले तरी सरकारने विविध टेलिकॉम कंपन्यांना त्याच्या चाचणीची परवानगी दिली आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या कंपन्या फाईव्ह जी तंत्रज्ञान बाजारात उतरवतील.

साधारण सहा महिन्यांमध्ये देशात फाईव्ह जीचा वापर सुरू होऊ शकतो आणि 2022 पर्यंत देशात फाईव्ह जी वापराने गती पकडलेली असेल, अशी अपेक्षा आहे. मात्र फाईव्ह जीचा हाच प्रचंड वेग मानवाच्या आणि पृथ्वीतलावरील अन्य सजीवांच्या जिवावर उठू शकतो, असा दावा केला जात आहे. फोर जीच्या तुलनेत अधिक प्रबळ आणि वेगवान असणार्‍या फाईव्ह जी लहरींमधून अधिक प्रमाणात किरणोत्सर्ग होऊन मानवी आणि पशुपक्ष्यांचे आयुष्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञान अधिक चांगल्या प्रकारे पोहोचवण्यासाठी अधिक टॉवर्सची आवश्यकता भासेल.

हे तंत्रज्ञान आपल्या स्मार्टफोनच्या पलीकडे बरेच काही करणार असल्यामुळे आपण सातत्याने या घातक किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊ शकतो, असा युक्तिवादही केला जात आहे. कमी पातळीचा किरणोत्सर्ग निर्माण करणार्‍या मोबाईल टॉवर्समुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या शक्यतेचा हा पुढचा टप्पा आहे. अधिक तीव्रतेच्या फाईव्ह जी टॉवरमुळे मानवी आरोग्याला असणारा धोका अधिक वाढेल, असे काही तज्ज्ञांना वाटते.

मोबाईल टॉवर्स, वायफाय राऊटर्स तसेच मोबाईल फोनमधून होणार्‍या किरणोत्सर्गाला नॉन आयोनायजिंग रेडिएशन म्हटले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने रेडिओफ्रिक्वेन्सी किरणोत्सर्गाची वर्गवारी कर्करोगास कारणीभूत ठरत असण्याची शक्यता असणार्‍या लहरींमध्ये केली आहे. मात्र यावर अधिक संशोधन होण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. रेडिओफ्रिक्वेन्सी लहरींच्या संपर्कात आल्याने मेंदूशी संबंधित विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते का, हे जाणून घेण्यासाठी अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत या संस्थेने व्यक्त केले आहे. उच्च दर्जाच्या किरणोत्सर्गामुळे शरीरातल्या टिश्यूंचे तापमान वाढून कर्करोगाला निमंत्रण मिळू शकते, यात शंका नाही.

सीटी स्कॅन किंवा क्ष-किरण चाचणी करताना वापरल्या जाणार्‍या उपकरणातून मोठ्या प्रमाणावर तीव्र स्वरुपाचा किरणोत्सर्ग होत असतो आणि हा किरणोत्सर्ग कर्करोगाला कारक ठरू शकतो. रुग्ण सातत्याने अशा अतितीव्र स्वरुपाच्या किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊ नये म्हणून डॉक्टर्स सीटी स्कॅन करून घेण्याचा सल्ला शक्यतो देत नाहीत. मात्र कमी तीव्रतेच्या रेडिओफ्रिक्वेन्सी लहरी सोडणार्‍या स्मार्टफोन, लॅपटॉप तसेच वायफायशी जोडलेल्या उपकरणांच्या आणि मोबाईल टॉवर्सच्या सततच्या संपर्कामुळे मानवी शरीराचे नुकसान होऊ शकते, असे तज्ज्ञ म्हणतात. म्हणूनच स्मार्टफोन तसेच मोबाईल टॉवरमधून होणार्‍या किरणोत्सर्गाच्या धोक्याबाबत विज्ञान काय सांगते हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरते. वायरलेस तंत्रज्ञानाच्या संपर्कामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने फाईव्ह जी तंत्रज्ञानाशी संबंधित परिच्छेदात म्हटले आहे. मात्र यासोबतच फाईव्ह तंत्रज्ञानासाठी वापरल्या जाणार्‍या लहरींबाबत पुरसे संशोधन झाले नसल्याचेही या संघटनेचे म्हणणे आहे.

दरम्यान, याआधी 2017 मध्ये 39 देशांमधल्या 190 शास्त्रज्ञांनी स्मार्टफोन, मोबाईल टॉवरच्या किरणोत्सर्गाबाबत चिंता व्यक्त करत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेला एक पत्र लिहिले होते. त्यात वायरलेस तंत्रज्ञानामुळे मानवी आरोग्य आणि एकंदरीतच पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्यामुळे त्याच्या वापराबाबत कठोर अशी नियमावली किंवा मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच अशा किरणोत्सर्गाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने फार काही केले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच फाईव्ह जी तंत्रज्ञानाच्या धोक्यांबाबत पुरेसे संशोधन होईपर्यंत या तंत्रज्ञानाच्या वापरावर निर्बंध आणण्याचीही मागणी केली होती. यासाठी त्यांनी विविध संशोधनांचा दाखला दिला.

अमेरिकेच्या नॅशनल टॉक्सिकोलॉजी प्रोग्रामअंतर्गत उंदरांवर संशोधन करण्यात आले होते. फोन रेडिओफ्रिक्वेन्सी किरणोत्सर्गाच्या अधिक संपर्कामुळे उंदरांमध्ये कर्करोगग्रस्त पेशींची वाढ झाल्याची बाब समोर आली होती. आज हे तंत्रज्ञान अगदीच नवे असून अवघ्या काही देशांमध्ये वापरले जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सुरू होऊन दोन वर्षांचा काळही लोटलेला नाही. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांबाबत पुरेशी माहिती समोर आलेली नाही. म्हणूनच यावर अधिक संशोधन होऊन योग्य ती माहिती आणि धोके जगासमोर येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच आपण फाईव्ह जीचा सुरक्षित वापर करू शकू.

- Advertisment -

ताज्या बातम्या