‘मुक्त’च्या ज्ञानगंगेने महाराष्ट्र समृद्ध: राज्यपाल; आभासी तंत्रज्ञानाद्वारे २६ वा दीक्षांत समारंभ

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने सुरू असलेल्या देशव्यापी प्रयत्नांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे योगदान मोठे असून, ज्ञानगंगेचा हा निर्माण झालेला प्रवाह कधीही न आटता सतत दूरपर्यंत चिरंतन प्रवाहतच राहील, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल केले.

मुक्त विद्यापीठाचा २६वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पद्धतीने वास्तव-आभासी पद्धतीने एक नवा अध्याय रचत काल विद्यापीठात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

या दीक्षांत सोहळ्यात मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गोंदिया येथील शैलेश चुटे, मुंबई येथील सईद रूख्सार फातेमा सईद अहमद, निकेश कुऱ्हाडे या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आभासी पद्धतीने कुलगुरू प्रा. ई वायूनंदन व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या सोहळ्यात स्नातकांना पदविका, पदव्युत्तर पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल, पी. एचडी प्रदान करण्यात आली. यात २०१९ व २०२० या दोन वर्षातील एकुण पदव्यांची संख्या दोन लाख ९३ हजार ८५२ असून, त्यात पदविकाधारक ४२ हजार ६१२, पदव्युत्तर पदविकाधारक ११४, पदवीधारक २ लाख १५ हजार २६९, पदव्युत्तर पदवीधारक ३५ हजार ८४९ यांचा समावेश असून, दोन्ही वर्षमिळून ५२ स्नातकांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. कुलगुरू प्रा. ई वायूनंदन म्हणाले, की कोविडमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन कालावधीत विद्यापीठाने अभ्यासकेंद्रांच्या सहकार्याने ऑनलाईन पद्धतीने ८ हजारहून अधिक संपर्कसत्रांचे आयोजन केले.

तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या १ लाख ९१ हजार १२८ विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली. डॉ. दिनेश भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दृकश्राव्य विभागाचे प्रमुख अभय कुलकर्णी यांच्या टीमने हा अनोखा वास्तव-आभासी तंत्रज्ञानाने युक्त असलेला दीक्षांत सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे, वित्त अधिकारी मगन पाटील, विद्याशाखांचे संचालक डॉ. प्रमोद खंदारे, डॉ. सुनंदा मोरे, प्रा. जयदीप निकम, डॉ. कविता साळुंके, डॉ. मधुकर शेवाळे, नागार्जुन वाडेकर, डॉ. प्रवीण घोडेस्वार आदी उपस्थित होते.

सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे (सन २०१९) : अमृतेश्वर दरफळकर (बीए), गीता बामणे (बीलिब), संजय रेंडाळकर (बीसीजे), निलेश कुऱ्हाडे (एमबीए), शैलेश चुटे (एमकॉम), लता पाटील तोडे (बीसीए), अर्शीया गोठेकर (बीएस्सी एमएलटी), निकीता अग्रवाल (बीआर्क).

सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे (सन २०२०) : सुप्रिया नळवाडे (बीए), सिद्धार्थ कुलकर्णी (बीलिब), महेंद्र सोडगे (बीसीजे), प्रज्ञा मराठे (एमबीए), नम्रता शिंदे (एमकॉम), विशाल वानखेडे (बीकॉम), शकीलखान पठाण (बीएड), आश्विनी राऊत (बीएस्सी ॲग्री), सचिन पांडे (बीएस्सी हॉस्पीटॅलीटी), सनी पांडे (बीएस्सी टुरीजम), मालव शहा (बीसीए), राज कपाडीया (बी आर्क). याशिवाय राजेश शर्मा, वसंत उगले, अतुल पटणे, राकेश मोरे, नंदकिशोर ब्राम्हणे यांना पीएचडी, तर नटवर तडवी, संगिता पाटील, प्रज्ञा पांढरे यांना एम. फिल. प्रदान करण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *