जि. प. अध्यक्ष क्षीरसागर यांच्याकडून अचानक भेटी; 21 सेवक विनापरवाणगी गैरहजर; वेतन कपातीचे आदेश

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेऊन एक महिना पूर्ण झाला आहे. क्षीरसागर यांनी आता कामाला जोरदार सुरुवात केली असून त्यांनी मंगळवारी (दि.4)शिवसेना स्टाईलने मुख्यालयातील विविध विभागांना अचानक भेटी देत सेवक,खातेप्रमुखांची झाडाझडती घेतली.अचानकपणे केलेल्या या पाहणी दौर्‍यामध्ये तब्बल 21 सेवक विनापरवाणगी गैरहजर आढळून आले. या सर्व सेवकांना कारणे दाखवा नोटीसा बजावत एक दिवसाचे वेतन कपातीचे तत्काळ आदेश अध्यक्ष क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले. अध्यक्षांनी दिलेल्या अचानक भेटीत सर्वच विभागातील सेवक आणि अधिकार्‍यांची चांगलीच धावपळ उडाली.

अध्यक्ष क्षीरसागर यांनी मंगळवारी दुपारी मुख्यालयातील विविध विभागांना अचानक भेटी दिल्या.शिक्षण विभागात त्यांनी प्रत्येक टेबलवर जाऊन येथे कोणता सेवक बसतो, काय काम करतो याची विचारपूस केली. यावेळी अनेक टेबलावर सेवक अनुपस्थित होते. विभागप्रमुखांकडून हजेरी नोंदवही मागवून घेत यात किती सेवक गैरहजर आहेत याबाबत विचारणा केली.कोणते सेवक विचारुन गेले याबाबत माहिती घेतली. शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्याकडूनही फाईलींबाबत माहिती घेत विचारणा केली.

यानंतर बांधकाम विभागात जाऊन,येथील सेवकांशी संवाद साधत सेवकांच्यां अडचणी आहेत का?अशी विचारणा त्यांनी केली.पशुसंवर्धन व समाजकल्याण विभागात जाऊन सेवकांंना कामाबाबत विचारणा केली असता,त्यांना सांगता आले नाही.त्यावर, सेवकांना खडेबोल सुनावित कामात सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

अर्थ, समाजकल्याण, कृषी विभागात जाऊन हजर सेवकांच्या त्यांनी नोंदी घेतल्या. गैरहजर सेवकांंबाबत माहिती घेतली. बांधकाम विभाग दोन व तीन विभागातील कामकाजाबाबत तक्रारी असल्याने सेवकांंनी योग्य कामे करावी, तक्रारी नको, अशा कानपिचक्या अध्यक्षांनी दिल्या. अध्यक्षांनी अचानक भेटी दिल्याने विभागातील सेवकांची चांगलिच धावपळ उडाली.येथेही अनेक सेवक जागेवर नव्हते. काही सेवक आवारात फिरत होते ते धावपळ करत आपाअपल्या टेबलावर हजर झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

अध्यक्ष क्षीरसागर यांनी 9 विभागांना भेटी दिल्या.यात सुमारे 21 सेवक टेबलावर नव्हते. यामध्ये आरोग्य 7, प्राथमिक शिक्षण 2, लघुपाटबंधारे (पश्चिम) 2, बांधकाम क्रमांक 1- 4, समाजकल्याण 2, बांधकाम क्रमांक 3 -3 याचा समावेश आहे. या सर्व सेवकांना नोटीसा बजाविण्याचे आदेश अध्यक्ष क्षीरसागर यांनी दिले आहेत. या सेवकांकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास या सेवकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेशही त्यांनी सामान्य प्रशासनाला दिले आहेत.

सेवकांची उडाली भंबेरी

आरोग्य विभागात अध्यक्ष क्षीरसागर यांनी भेट दिली असता, विभागातील एका कोपर्‍यात चार-पाच सेवकांच्या गप्पा रंगल्या होत्या.त्यांना आपल्या जवळ अध्यक्ष आले असल्याचेही समजले नाही. अध्यक्ष जाऊन उभे राहिल्यानंतर काही वेळांनंतर, अध्यक्षांनी त्यांना विचारणा केली असता त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. विभागात अनेक सेवक गैरहजर दिसून आले.यामुळे अध्यक्षांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

ऊलन कापड चौकशीचे आदेश

मुख्यालयातील भांडार रूमला अध्यक्ष क्षीरसागर यांनी भेट दिली असता येथे परिचरांना देण्यात येणारा ऊलनचे कापड तसेच पडून असल्याचे दिसून आले. हे कापड कसले आहे, याची विचारणा करताच ते परिचर यांच्यांसाठी जॅकेट शिवण्यासाठी देण्यात येणारा कपडा असल्याचे सांगण्यात आले. एकूण 1100परिचरांंयांपैकी केवळ 600 परिचरांनाच हा कपडा देण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित 400 परिचरांना कपडा का दिला नाही अशी विचारणा अध्यक्ष क्षीरसागर यांनी केली असता,परिचरांनी मागणी केली नसल्याचे उत्तर संबंधितांकडून देण्यात आले.त्यावर अध्यक्ष क्षीरसागर संतत्प झाले. सेवकांच्या मागणीची वाट बघण्यापेक्षा तुम्हीच त्यांना का वाटप केले नाही ? असा प्रश्न केला. याबाबत तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अध्यक्ष क्षीरसागर यांनी यावेळी दिले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *