Wednesday, April 24, 2024
Homeनगरपहिली ते नववीचे सात लाख विद्यार्थी ‘वर्गोन्नत’

पहिली ते नववीचे सात लाख विद्यार्थी ‘वर्गोन्नत’

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

करोनामुळे गेल्या वर्षभरात पहिली ते नववीच्या शाळा सुरूच होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. परिणामी जिल्ह्यातील पहिले ते नववीच्या 7 लाख 2 हजार विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर श्रेणी- उत्तीर्ण अथवा पास याऐवजी ‘वर्गोन्नत’ असा शेरा मारून त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनामुळे प्रारंभी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद होत्या. परंतु ऑक्टोबर, नोव्हेंबर 2020 पासून काहीशी परिस्थिती निवळल्यानंतर प्रारंभी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग हळूहळू सुरू करण्यात आले. मात्र, पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा वर्षभर बंद होत्या. कालांतराने करोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने, आहे त्या शाळाही बंद कराव्या लागल्या. पुढे शासनाने पहिली ते अकरावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय घेतला.

यात दहावीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आल्या असल्या तरी या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत शिक्षण विभागाने ठोस निर्णय घेतलेला नाही. मात्र, पहिले ते नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात पदोन्नत करण्यात आले आहे. दरम्यान, दरवर्षी विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक तयार करताना शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर त्याचे गुण, श्रेणी, उंची, वजन, उपस्थिती अशा बाबी नमूद करत असत. मात्र यंदा शाळा भरली नसल्याने आणि परीक्षाही होणार नसल्याने शासनाने पहिली ते नववीपर्यंत 7 लाख 2 हजार विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर वर्गोन्नत असा उल्लेख करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे शिक्षक असा उल्लेख करून ही प्रगतीपुस्तक तयार करणार आहेत.

कोणत्या वर्गाचे किती…?

पहिले ते पाचवीचे 3 लाख 82 हजार 117 एकूण विद्यार्थी असून यात 2 लाख 5 हजार 395 विद्यार्थी आणि 1 लाख 76 हजार 722 विद्यार्थीनी, तर सहावी ते आठवी 2 लाख 39 हजार 562 एकूण विद्यार्थी असून यात 1 लाख 31 हजार 351 विद्यार्थी आणि 1 लाख 8 हजार 211 विद्यार्थीनी आहेत. नववीचे 81 हजार 200 एकूण विद्यार्थी असून यात 45 हजार 434 विद्यार्थी आणि 35 हजार 766 विद्यार्थी आहेत.

असा होणार बदल

प्रगतीपत्रावर यापूर्वी विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवस, उंची, वजन, तसेच गुणवत्तानिहाय श्रेणी हा उल्लेख असायचा. परंतु आता असा उल्लेख असणार नाही. प्रगतीपत्रकावर केवळ वर्गोन्नत असा उल्लेख असेल. यामुळे यंदा पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तकच बदलणार आहे.

दहावी घोळ कायम

शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना 11 वीच्या वर्गात प्रवेश देण्यावरून गोंधळ कायम आहे. यासाठी स्थापन अभ्यास समितीचे दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमान कसे करावे, हे स्पष्ट केलेले नाही. मात्र, दहावी विद्यार्थ्यांना एक कॉमन प्रमाण देणे गरजेचे झालेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अकरावी वगळून अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षणासाठी जावयाचे आहे, त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यात दहावीची परीक्षा व्हावी आणि होऊ नयेत, अशा दोन्ही बाजूने न्यायालयात धाव घेतल्याने गोंधळात आणखी भर पडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या