Tuesday, April 23, 2024
HomeजळगावDeshdoot Special Story with Photos # 18 ऑगस्ट, आडगावच्या इतिहासातील काळा दिवस...

Deshdoot Special Story with Photos # 18 ऑगस्ट, आडगावच्या इतिहासातील काळा दिवस…

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 ला देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वांतंत्र्य लढ्यात देशभरातील अनेक देशभक्त क्रांतिकारांनी प्राणांची बाजी लावत ब्रिटीशांच्या गुलामीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या सर्वांचे या निमित्ताने स्मरण करण्यात आले. असे असले तरी 13 ऑगस्ट 1942 ला स्वतंत्र झालेल्या एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे 18 ऑगस्ट हा दिवस गेल्या 80 वर्षापासून काळा दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी स्वातंत्र्योत्तर काळातील सर्व शासकीय अधिकारी व लोकप्रतिधी आडगावला आवर्जून हजेरी लावत येथील स्मारकावर नतमस्तक होत असतात. काय आहे या स्मारकाचा आणि काळा दिवस पाळण्याचा इतिहास वाचाच…

एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे 18 ऑगस्ट 1942 ला सायंकाळी पाच वाजता इंग्रजांच्या विरोधात जंगल सत्याग्रह झाला. त्यात कै. भगवान भुसारी,कै. शामराव पाटील,कै. त्रंबक वाणी शहीद झालेत. या शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ आडगाव येथे भव्य असे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. ही स्मारकाची वास्तू येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या स्मारकास विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी भेट दिली. एरंडोल च्या डी. डी .एस .पी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मशाल रॅली काढत या स्मारकात समारोप केला. अमृत महोत्सवानिमित्त या स्मारकास रोषणाई करण्यात आली होती.

- Advertisement -

18 ऑगस्ट 1942 ला आडगाव येथे मुजोर इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्य लढ्याची क्रांती झाली. या क्रांतीत तीन हुतात्मे शहीद झालेत.कै. भगवान भुसारी,कै. शामराव पाटील,कै. त्र्यंबक वाणी हे शहीद झालेत . इंग्रजांशी लढताना स्वातंत्र्य सैनिकांनी गोळ्या झेलल्या. क्रांतीनंतर अनेकांना कारावास भोगावा लागला. या सर्व क्रांतीचे प्रतीक म्हणजेच आडगावचे हुतात्मा स्मारक होय .एकाच दिवशी तीन हुतात्म्यांचे बलिदान घेणारा हा सत्याग्रह एकाएकी घडलेला नव्हता.

लढ्याची पार्श्वभूमी

स्वातंत्र्यपूर्वकाळात लोक जागृतीसाठी आडगाव मागे नव्हते. सत्यशोधक चळवळीचा आधार घेऊन समाज जागृती चे काम देवराम विठोबा महाजन, पुंडलिक बारकू महाजन, चिंधू कृष्णा वाघ ,काशीराम देवाजी पाटील, बळीराम तोताराम महाजन ,देवराम रामचंद्र वाघ इत्यादी कार्यकर्ते करत होते.1930 साली झालेल्या मिठाच्या सत्याग्रहासाठी पिंप्राळा येथील शिबिरासाठी आडगावचे कार्यकर्ते उपस्थित होते.

1940 साली झालेल्या ‘कायदेभंग चळवळीत’ गांधीजींच्या नेतृत्वात आडगाव येथील भगवान भुसारी, दशरथ महाजन ,नारायण मुसांडे, हरी पाटील ,बुधा महाजन सहभागी झाले होते. 9 ऑगस्ट 1942 ला ‘चले जावची ‘घोषणा झाली. बातमी आडगाव पर्यंत पोहोचली. भगतसिंग चौकात सभा झाली .क्रांतीचा निर्णय झाला.

18 ऑगस्ट 1942 आडगाव चा इतिहासातील काळा दिवस

गांधीजींचे सचिव महादेव भाई यांच्या मृत्यूमुळे आडगाव येथे बंद पाळण्यात आला. आडगावच्या बाहेर जंगल सत्याग्रहाच्या जागेवर सभा झाली. सभेत असंख्य स्त्री पुरुष उपस्थित होते. सभा संपल्यानंतर सत्याग्रही गावात येत असताना, फौजदाराने गावाजवळ मोर्चा अडवला. त्यात नेतृत्व करणारे भगवान भुसारी पुढे आले व “आमचे गाव 13 ऑगस्ट 1942 पासून स्वतंत्र “झाल्याचे सांगितले.

गर्दी पांगवण्याच्या उद्देशाने बुधा नागो महाजन यांच्या डोक्यात काठी मारली. जमाव संतप्त झाला. भगवान भाऊंनी फौजदाराचे शिरस्त्राण फेकले .कमरेचा पट्टा ओढला. फौजदाराने भगवान भाऊंच्या अंगावर गोळ्या झाडल्या. भगवान भुसारी धारातीर्थी पडले ,तर त्र्यंबक वाणी शहीद झाले . कौतिक दगडू पाटील यांनी पोलिसा कडची बंदूक काढून घेत मोडली .गोळीबारात जखमी असलेले शामराव पाटील एरंडोलला गतप्राण झालेत .काही स्वातंत्र्य सैनिकांना धरणगाव दवाखान्यात नेले, काही जळगाव दवाखान्यात नेले.

स्वातंत्र्य सैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले .त्याचा निकाल 18 जून 1943 ला न्यायालयाने दिला .त्यात काही जणांना दोन वर्ष ,काही जणांना सहा महिने ,तीन महिने कारावासाची शिक्षा झाली.

या लढ्यात तीन हुतात्म्याशिवाय शहादु सोमा चौधरी ,नारायण मुसांडे, कौतिक दगडू पाटील ,सखा लक्ष्मण पुणेकर ,बाजीराव फुला पाटील, बुधा नागो महाजन, दशरथ रामचंद्र महाजन, हरी सिताराम पाटील ,नामदेव तोताराम पाटील ,खंडेराव लांडे ,धुडकू राघो मिस्तरी ,शिवराम नागो पाटील, देवचंद आबाजी महाजन ,धनराज पांडे इत्यादींसह 30 सत्याग्रहींवर गुन्हे दाखल झाले.

एरंडोल तालुक्यात सर्वात जास्त सक्रिय चळवळ आडगाव येथे झाली असून, एरंडोल तालुक्यात सर्वात जास्त स्वातंत्र्य सैनिक आडगाव येथे आहेत. त्यांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री बॅ.अंतुले यांच्या कार्यकाळात हे स्मारक उभारण्यात आले आहे. हे भव्य स्मारक इतिहासाची साक्ष देत असून ,येणाऱ्या पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.

” माझे चारही मुले लढ्यात सामील झाले तरी मी घाबरणार नाही”. हे उद्गगार माझ्या वडिलांचे आहेत. माझे वडील आणि काका लढ्यात सामील होते, पोलिसांनी माघार घेण्याचे सांगितले तेव्हा परखडपणे माझ्या वडिलांनी त्यांना उत्तर दिले अशा माझ्या वडिलांविषयी मला सार्थ अभिमान आहे. आडगाव क्रांतीच्या निमित्ताने उभारलेल्या स्मारकाला शासनाने कायमस्वरूपी देखरेखी साठी माणूस नेमावा. तिथे सुंदर बगीचा व्हावा व स्मारकाला लक्षवेधी ठरेल असे भव्य गेट असावे.

मोहनदास बुधा महाजन, स्वा.सै.कै. बुधा नागो महाजन यांचे सुपुत्र (माजी सरपंच-आडगाव)

स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांनी ट्रस्ट करावे स्वातंत्र्याच्या क्रांतीनंतर आडगाव येथे भव्य हुतात्मा स्मारक झाले .मधल्या काळात या स्मारकाची अतिशय दुर्दशा झाली होती. तेव्हा शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून हे स्मारक ऐतिहासिक वास्तू व्हावे, त्यासाठी पाठपुरावा होणे आवश्यक आहे .म्हणून स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांनी ट्रस्ट करणे आवश्यक आहे. परिणामी या वास्तूचे चांगले संगोपन होईल. त्यासाठी शासनाने जाणीवपूर्वक लक्ष घातले पाहिजे.

शांताराम नामदेव पवार, स्वा.सै.कै. नामदेव तोताराम पवार यांचे सुपुत्र (मा. ग्राम पंचायत सदस्य, आडगाव.)

माझ्या आजोबांनी गांधी विचाराने प्रेरित होऊन अहिंसेच्या मार्गाने देशसेवेसाठी आयुष्य अर्पण केले. परिवाराचा विचार न करता देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढले. क्रांतिकारकांच्या या लहानशा गावाला स्वातंत्र्यानंतर विकासासाठी माझे आजोबा प्रयत्नशील राहिले .ग्राम सेवा केंद्राच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या .शाळेची स्थापना केली. अस्पृश्यता निवारण ,हागणदारी मुक्त गाव यासाठी प्रयत्नशील राहिले. कै.सिताराम भाईंच्या सोबत जळगाव जिल्ह्यात गिरणीचे पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले .,अशा आजोबांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

महेश सोपान चौधरी. स्वा.सै.कै. शहादु सोमा चौधरी यांचे नातू

“स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जागृत करणारे भव्य असे हुतात्मा स्मारक आडगाव ला आहे ,त्याच्या निगा व दुरुस्तीसाठी शासनाने अमृत महोत्सवानिमित्त कायमस्वरूपी योजना तयार करावी. येणाऱ्या पुढच्या तरुण पिढीने या स्मारकातून प्रेरित होऊन देश सेवेसाठी प्रयत्नशील व्हावे हीच अपेक्षा.”

संतोष शिवराम पाटील. स्वा.सै.कै. शिवराम नागो पाटील यांचे सुपुत्र , मा. ग्राम पंचायत सदस्य ,आडगाव.

आमच्या गावातील हुतात्मा स्मारक पाहून गावचे देशासाठी आमच्या वडीलांनी किती त्याग केला ,याचे स्मरण होईन अभिमान वाटतो वडील सांगायचे 18,ऑगस्ट 1943 यादिवशी ब्रिटिश पोलिसांनी आम्ही जंगल सत्याग्रह करून परत येत असताना गाव वेशी जवळ अडविले असता त्याच्याशि बाचाबाची होऊन त्यांनी गोळीबार सुरू केला, त्यात भगवान भुसारी, त्रिंबक वाणी, श्यामराव पाटील हे शहीद झाल. वडलांनी प्रसंग ओळखून पोलिसाच्या हातातील बंदूक पाठीमागून उडी मारुन हिसकावून घेतली व दगडावर आपटून तिचे तुकडे केले. वडीलांनी येवढे साहस त्या काळी केले याचा अभिमान वाटतो त्यानी केलेल्या या पराक्रमामुळे 3 वर्ष 3 महिने कारावास भोगावा लागला, गांधी यांच्या यांचा बरोबर येरवडा कारागृहात राहीले. देश प्रेमा पोटी खुप हाल सहन केले जिवंत राहू किवा नाही याचीही खात्री नव्हती, जिल्ह्य़ातील 3 स्वातंत्र्य वीरांना 1973 मध्ये मुंबई येथे भव्य सत्कार पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आला, वडीलांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण होऊन ऊर भरून येतो, अश्या या महान हुतात्मे व स्वातंत्र्य वीरांना विनम्र अभिवादन.

जिथे चळवळीच्या संदर्भात बैठका व्हायच्या तो भगतसिंग चौक येथील स्मारक

जिथे आडगावची क्रांती झाली ,त्या जागेवर उभारण्यात आलेला सिंहरूपी स्तंभ. जो जगाला क्रांतीचे आवाहन करत आहे, असे “हुतात्मा भवन “जिथे आज ग्रामपंचायत कार्यालय आहे.

आडगाव क्रांतीत शहीद झालेले तीन स्वातंत्र्य सैनिक व ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत असे 30 स्वातंत्र्य सैनिक

स्वा.सै.कै. नामदेव तोताराम पवार यांचे निवासस्थान

स्वा.सै.कै. बुधा नागो महाजन यांचे निवासस्थान

- Advertisment -

ताज्या बातम्या