15 चारी परिसरातील शेतकर्‍यांवर ‘कोणी रोहित्र देता का रोहित्र’ म्हणण्याची वेळ

राहाता |वार्ताहर| Rahata

शहरातील 15 चारी येथील बोठे, लांडगे या परिसरातील रोहित्र गेल्या 15 दिवसापासून नादुरुस्त झाल्याने वीज महावितरण कंपनीला रोहित्र बसवण्यासाठी अनेकदा विनंती करूनही या ठिकाणी अद्याप रोहित्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिके पाण्याअभावी जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून कुणी रोहित्र देता का रोहित्र अशी म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

जवळपास 15 दिवसापासून रोहित्र नादुरुस्त झाल्याने या रोहित्रावर अवलंबून असलेले 15 ते 20 कृषी पंपांची वीज पुरवठा खंडित झाल्याने या परिसरातील शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. येथील शेतकर्‍यांनी वीज महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना नादुरुस्त झालेले रोहित्र तात्काळ बसवावे, अशी विनंती अनेकदा करूनही अधिकार्‍यांनी अद्याप या ठिकाणी रोहित्र बसवले नाही. परिणामी येथील शेतातील मका, घास, पेरू, चिकू, डाळिंब, ऊस ही पिके जळून जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.

सध्या उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने. शेतातील पिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकर्‍यांनी दूध व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. या परिसरात प्रत्येक शेतकर्‍यांकडे पशुधन आहे. त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता असल्यामुळे पशुधनाला पिण्याची पाण्याची गरज भासते. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी रोहित्र बंद असल्यामुळे पशुधनाला पिण्याचे पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांना टँकर खरेदी करून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

तसेच पशु धनासाठी लागणारा चारा मका, ऊस व घास हेच पाण्याअभावी जळून जात असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या बरोबरच पेरू, चिकू, डाळिंब, आंबा या फळबागांना पाण्याची अत्यंत गरज असून त्यांना वेळेत पाणी मिळाले नाही तर पाण्याअभावी फळे सुकून जाण्याची भीती शेतकरी बांधवांना सतावत आहे.

रोहित्र नादुरूस्तीने पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहे. महावितरण कंपनीने तात्काळ या ठिकाणी रोहित्र बसून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अन्यथा परिसरातील शेतकर्‍यांना नाइलाजास्तव उपोषणस बसण्याचा मार्ग अवलंबावा लागेल.

– मधुकर बोठे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी, राहाता


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *