Photo मानाच्या श्री दादा व श्री बाबा गणपतीची 139 वर्षांची परंपरा

jalgaon-digital
3 Min Read

नंदुरबार | दि.११| प्रतिनिधी NANDURBAR

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यापुर्वीपासूनच नंदुरबारातील मानाचे श्री दादा आणि श्री बाबा गणपतीची परंपरा सुरु आहे. यंदा श्रीमंत दादा गणपतीचे हे १३९ वे तर श्रीमंत बाबा गणपतीचे १३८ वे वर्ष आहे. यासह नंदुरबारात मानाचे भाऊ, तात्या, काका, मामा अशा गणपतींची स्थापना करण्यात येते.

नंदुरबारातील गणेशोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केले. मात्र, त्याच्याही ११ वर्षापुर्वीपासून नंदुरबारात श्रीमंत दादा गणपतीची स्थापना करण्यात येत आहे.

श्रीमंत दादा गणपतीची सन १८८२ ला प्रथम स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १८८३ मध्ये श्रीमंत बाबा गणपतीची स्थापना करण्यात आली. दादा गणपतीचे यंदाचे हे १३९ वे तर बाबा गणपतीचे १३८ वे वर्ष आहे. यासह मानाचे भाऊ, तात्या, मामा, काका गणपतींचीही स्थापना करण्यात येते.

श्री दादा व श्री बाबा गणपतीची मुर्ती ही काळया मातीपासून तयार करण्यात येते. विशेष म्हणजे या दोन्ही मानाच्या गणपतींची मुर्ती रथावरच तयार करण्यात येते. गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी रथावर काळया मातीचा डोंगर उभा केला जातो.

त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते या डोंगराला आकार देतात. सदर गणपती तयार करण्यासाठी कोणताही साचा किंवा साधनसामुग्री वापरली जात नाही. हाताच्या सहाय्यानेच या मुर्तीला आकार दिला जातो. प्रत्येक वर्षी अगदी तशीच्या तशी मुर्ती साकारली जाते हे विशेष.

गेल्या काही वर्षांपासून इको फे्रेडली गणेशाबाबत जनजागृती केली जात आहे. परंतू दादा आणि बाबा गणपती हे गेल्या १३९ वर्षापासून इको फे्रेंडली गणपती तयार करत आहेत. गणपतीला आकार दिल्यानंतर त्याच्या रंगरंगोटी करण्यात येते.

त्यानंतर आभुषणे चढविली जातात. नवसाला पावणारे गणपती म्हणून श्रीमंत दादा आणि श्रीमंत बाबा गणपतीची ख्याती आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त हजारो भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात.

हरिहर भेट

नंदुरबारातील श्रीमंत दादा व बाबा गणपतीची हरिहर भेट हे एक वेगळे आकर्षण असते. गेल्या १३८ वर्षापासून हरिहर भेटीची परंपरा कायम आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी नियोजीत वेळेत दोन्ही मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.

श्री दादा गणपतीची मिरवणूक नियोजीत मार्गावरुन जळकाबाजार परिसरात येते, तोपर्यंंत श्री बाबा गणपतीची मिरवणूक एकाच परिसरात असते. रात्री ९ च्या सुमारास जळकाबाजार परिसरात दोन्ही गणपती एकमेकांसमोर येतात.

यावेळी गुलालाची, फुलांची प्रचंड उधळण करण्यात येवून ढोलताशांचा गजर करण्यात येतो. दोन्ही गणपतींची आरती केली जाते. त्यानंतर मिरवणूका मार्गस्थ होतात. यावेळी गणेशभक्तांचा उत्साह दिसून येतो.

मिरवणुकांमध्ये सर्वात पुढे श्री दादा गणपती, त्यानंतर श्री बाबा गणपती असतो. त्यानंतर इतर मानाचे गणपती व शहरातील गणेश मंडळांच्या मिरवणूका नेण्यात येतात. ही परंपरा शेकडो वर्षापासून आजही कायम आहे. यापुर्वी हरिहर भेट पहाटेच्या सुमारास व्हायची. परंंतू गेल्या काही वर्षापासून सदर भेट रात्री ९ च्या सुमारास होत आहे.

पुण्यानंतर नंदुरबारचा गणेशोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. येथील विसर्जन मिरवणूक हे आकर्षण असते. मिरवणूकांमध्ये वाजविली जाणारी वाजंत्री आणि लेझिम नृत्य हे गणेशभक्तांना विशेष आनंद आणि उर्जा देत असते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *