Thursday, April 25, 2024
Homeनगर115 टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्याची कार्यवाही प्रगतीपथावर

115 टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्याची कार्यवाही प्रगतीपथावर

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

पश्चिमवाहिनी नदी खोर्‍यातील अतिरिक्त 115 टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक असलेली कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून जलमित्र सुखदेव फुलारी यांना देण्यात आली आहे.,

- Advertisement -

जलसंपदा मंत्री जयंत पाटील 30 सप्टेंबर रोजी नेवासा तालुक्याच्या दौर्‍यावर आले असता भेंडा येथे जलमित्र सुखदेव फुलारी व डॉ.अशोकराव ढगे यांनी त्यांना नदीजोड योजनांचे काम तातडीने हाती घेवून, कार्यान्वित करुन तुट असलेल्या गोदावरी खोर्‍यात पश्चिम घाटमाथ्यावरील पाणी प्राधान्याने सोडून पाण्याची उपलब्धता वाढविणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत निवेदन दिले होते.

त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाच्या कक्ष अधिकारी समृद्धी आत्राम यांनी जलमित्र सुखदेव फुलारी यांना शासनाचे वतीने पत्र पाठवून पश्चिमवाहिनी नदी खोर्‍यातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोर्‍यात वळविणे व नद्या जोड प्रकल्पांची सध्याची वस्तूस्थिती अवगत केली आहे.

पत्रात त्यांनी म्हटले की, शासन निर्णय दि. 19 सप्टेंबर 2019 अन्वये आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरण-गोदावरी व दमणगंगा-एकदरे- गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरीत हाती घेण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.

त्यानुषंगाने पार गोदावरी या नदीजोड योजनाची अंदाजपत्रके मुल्यार्पणास्तव राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांना सादर करण्यात आली आहेत. व दमणगंगा वैतरण- गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड योजनाचे सविस्तर प्रकल्प तयार करण्याचे काम राष्ट्रीय जलविकास अभिकरण यांच्याकडुन प्रगतीत आहे. मराठवाड्यातील तुट भरुन काढण्यासाठी कोकणातून नदीजोड प्रकल्पामार्फत गोदावरी खोर्‍यात पाणी वळविणे प्रस्तावित आहे. राज्य एकात्मिक जलआराखडा मध्ये यासाठी 115 टीएमसी पाणी वळविणेची तरतूद आहे.

पश्चिमवाहिनी नदी खोर्‍यातील (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाडयात वळविणेसाठी एकात्मिक राज्य जल आराखडयात अंतर्भूत असलेल्या योजनांचा प्राथमिक अभ्यास करणेसाठी शासन निर्णय दि. 17 सप्टेंबर 2019 अन्वये कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणेत आली आहे. सदर समितीने त्यांचा अहवाल दि.31 ऑक्टोबर 2019 रोजी शासनास सादर केला आहे. त्यानुसार गोदावरी खोर्‍यात कोकणातील नार-पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोर्‍यातून एकूण 89.85 अघफू पाणी वळविणेबाबत आखणी करून त्याबाबत शिफारस केली आहे.

उपरोक्त पैकी 2.43 अघफू पाणी वळणाच्या पूर्ण/बांधकामाधीन योजना आहेत. 15.55 अघफू पाणी वळणाबाबत पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे गोदावरी नदीजोड योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहेत. तसेच दमणगंगा पिंजाळ पूर्ण झाल्यावर उर्ध्व वैतरणा धरणातून गोदावरी खोर्‍यात 10 अघफू पाणी सोडणे शक्य आहे. उर्वरीत 61.88 अघफू पाणी वळणाबाबतच्या योजनांचे सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत कार्यवाही प्रगतीत आहे.उपरोक्त नदीजोड योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर राज्याच्या आर्थोपायाच्या स्थितीनुसार व राज्यपाल महोदयांच्या निर्देशाच्या अधीन राहून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या