Wednesday, April 24, 2024
Homeनगरदहावी-बारावीच्या गणित-इंग्रजीच्या पेपरला परीक्षा केंद्रावर पथक तैनात

दहावी-बारावीच्या गणित-इंग्रजीच्या पेपरला परीक्षा केंद्रावर पथक तैनात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येत्या काही दिवसांत सुरू होणार्‍या दहावी व बारावी परीक्षेत कोणतेही गैरप्रकार न होता कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडतील, याचे चोख नियोजन संबंधित यंत्रणेने करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी दिल्या. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान गणित आणि इंग्रजीच्या पेपरला गटशिक्षणाधिकारी यांचे बैठे पथक परीक्षा केंद्रावर तैनात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

- Advertisement -

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी अशोक कडूस आदी उपस्थित होते. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होत आहे. बारावी परीक्षेसाठी 108, तर दहावीसाठी 179 परीक्षा केंद्र आहेत.

या परीक्षांमध्ये कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत, याचे नियोजन तालुका, तसेच केंद्रस्तरावर अधिकार्‍यांनी करावे. गणित व इंग्रजी विषयांच्या पेपरला प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात असावे, तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रांवर व्हीडिओ चित्रीकरण करावे, सर्व परीक्षा केंद्र संचालकांची बैठक घेऊन त्यांना केंद्र स्तरावर दक्षता पथक निर्माण करावे, परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमाव करू नये, भरारी पथकाने जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात, परीक्षा केंद्रांवर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा, केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर पेपर कालावधीत बंद ठेवावेत. कोणत्याही स्थितीत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये किंवा कॉपी होणार नाही, याचे चोख नियोजन यंत्रणेने करावे. कॉपीमुक्त जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात 7 भरारी पथके

बारावीसाठी जिल्ह्यातून 63 हजार 313, तर दहावीसाठी 69 हजार 534 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले आहेत. जिल्ह्यात 7 भरारी पथकांद्वारे गैरप्रकाराला आळा घातला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या