राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू

राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू

नाशिक | प्रतिनिधी

देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन असून, केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला मुभा आहे. असे असतानाही केंद्राने २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तशी सूचना केली असून टाेल वसूली पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आली आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्चला संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल वसुली तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचे आदेश दिले.

पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत होता. आता त्यात वाढ करण्यात आली असून, ३ मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

मात्र, लॉकडाऊन वाढवला असला तरीही, महामार्गांवरील टोलवसुली बंद ठेवण्याचा निर्णय मात्र रद्द केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व प्रकारच्या जीवनावश्यक माल वाहतुकीला परवानगी दिली आहे.

तसेच, केंद्रीय गृह मंत्रालयाने चारच दिवसांपूर्वी या मालवाहतुकीला कोणताही अडथळा येऊ न देण्याची सूचना राज्यांना केली आहे. मात्र, आता या वाहतुकीला टोलवसुलीचा फटका बसणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com