साड्या-गोधड्यांच्या भिंती असणार्‍या शौचालयाचा पोलिसांकडून वापर

0

शौचालय दाखवा अन् 21 हजार मिळवा : पोलीस कर्मचार्‍याने डीआयजींना पाठविला धनादेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – घर तेथे शौचालय यासाठी सरकारचा अटोकाट प्रयत्न आहे. मात्र, नगर शहरातील पोलीस मुख्यालयातच शौचालय नसल्याचे समोर आले आहे. पोलीस प्रशासनाने ज्या शौचालयाची व्यवस्था केली आहे, त्यांना भिंतीच नाही. तर चारही बाजूंनी साड्या-गोधड्या लावून त्याचा वापर केला जात आहे.
त्यामुळे एका बडतर्फ पोलीस कर्मचार्‍याने पोलीस महासंचालकांना (डीआयजी) यांना थेट चॅलेंज केले आहे. 21 हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या नावे काढला असून जर शौचालय दाखविले तर ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी त्याने केली. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांच्या निवार्‍याची आणि आरोग्याची समस्या ऐरणीवर आली आहे.
शहरातील पोलीस मुख्यालयात कॉलनी क्रमांक 3, 4 व 5 यामध्ये शासनाने शौचालये बांधली आहेत. मात्र त्यांना खरोखर शौचालये म्हणता येईल का? असा थेट प्रश्‍न या बडतर्फ कर्मचार्‍याने केला आहे. या शौचालयांना केवळ भांडे बसविण्यात आले आहे. मात्र, त्यांना एकही भिंत नाही. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांनी या शौचालयांना गोधड्या व साड्यांचे कुंपन केले आहे.
विशेष म्हणजे या शौचालयाची जागा देखील चुकीच्या ठिकाणी आहे. मोठ्या तारेवरची कसरत करत या ठिकाणी पोलीस कर्मचार्‍यांना साड्या-गोधड्यांच्या भिंती असणार्‍या शौचालयाचा वापर करावा लागत आहे. यामुळे पोलीस कर्मचार्‍यांसाठी तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. कोणी आवाज उठविला तर त्यांच्यावर कारवाईची कुर्‍हाड कोसळते. त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? असा प्रश्‍न कर्मचार्‍यांमध्ये होता.
या असूविधेवर आवाज उठविण्यासाठी एका बडतर्फ कर्मचार्‍याने पाठपुरावा केला. मात्र, त्यांना देखील कारवाईला सामोरे जावे लागले आहे. तरी देखील या कर्मचार्‍याने थेट राज्याचे मुख्यमंत्री व पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांना आव्हान केले आहे. पोलीस मुख्यालयात शौचालय दाखवा असे चॅलेंज करण्यात आले असून ओट्यावर मांडलेल्या भांड्याला शौचालय म्हणत असेल तर 21 हजार रूपये रोख देण्याचे आश्‍वासन दिले आहे.
या कर्मचार्‍याने 21 हजार रुपयांचा चेक पोलीस महासंचालक मुंबई यांच्या नावे काढला असून तो मुंबई कार्यालयात सादर केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची लवकरच चौकशी लगण्याची शक्यता असून पोलीस कर्मचार्‍यांना योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षा पोलीस कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे.

… तर मी पेटवून घेईल
मी पोलीस कॉलनीतील वस्तुस्थिती अर्जाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. हे जर चुकीचे वाटत असेल तर, अधिकार्‍यांनी कॉलनी क्रमांक 3, 4, 5 यामध्ये जाऊन याची शहानिशा करावी. जर प्रशासनाने बांधलेल्या शौचालयास खरोखर कायदेशीर शौचालय म्हणता येत असेल तर मी स्वत:ला पेटवून घेईल, असे संबंधित तक्रारदार पोलीस कर्मचार्‍याने अर्जात म्हटले आहे.

मला कल्पना नाही
गृहखात्याचा पदभार माझ्याकडे नुकताच आला आहे. त्यामुळे कोणत्या कर्मचार्‍याने काय अर्ज केला आहे. तसेच कोणाला धनादेश दिला आहे. याची मला कल्पना नाही. या प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल अशी माहिती सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*