राष्ट्रवादीचा आज एल्गार!

0
नेते उतरणार रस्त्यावर : सरकारविरोधात लढा करणार तीव्र
अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी आणि सामान्य जनतेच्या समस्या बधीर सरकारच्या कानापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार मोर्चा गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले यांनी दिली आहे.
पक्षाने गेल्या काही दिवसात तालुका मोर्चे यशस्वी केले. आता जिल्ह्यास्तरावर एल्गार मोर्चा काढून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोर्चात शेतकरी, शेतमजूर, युवकांसह सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे, असा दावा पक्षातर्फे करण्यात आला. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, जिल्हा प्रभारी आ.दिलीप वळसे पाटील, निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष घुले यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे आमदार, पदाधिकारी मोर्चात सहभागी होणार आहेत.
देशातील जनमत भाजपा सरकारच्या विरोधात जात आहे. आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागा, असा आदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत पदाधिकार्‍यांना दिला. त्याचा परिणाम मोर्चाच्या तयारीवरही जाणवला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले होते. शेतकरी कर्जमाफीतील फसवणूक, सहकारी संस्थांची कोंडी, नोटाबंदीनंतर वाढलेली बेरोजगारी अशा मुद्यांवर पक्षाकडून सरकारवर सध्या टिकेचा भडीमार केला जात आहे. याची पुनरावृत्ती या मोर्चातही दिसेल, असे म्हटले जात आहे.
गेल्या काही दिवसांत खुद्द शरद पवारांनी नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाला या जिल्ह्यातून अधिक यशाची अपेक्षा आहे. मात्र पक्षातील काही नेते आपसातील साठमारीत गुंतले आहेत. मात्र पक्षातील नेत्यांच्या अस्तीत्वावर प्रश्‍नचिन्ह असल्याने संघटना पातळीवर पुन्हा एकदा बांधणी सुरू झाली आहे. आंदोलनातून जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. नगरच्या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळणार, याकडे पक्षाचे नेते लक्ष ठेवून आहेत.

 

LEAVE A REPLY

*