Type to search

Featured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

अजित पवार आज अकोलेत निव्वळ डागडूजी की आक्रमण?

Share
दोन वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करू - अजित पवार, dr ambedkar memorial in mumbai to be completed in two years says ajit pawar today

अकोले (प्रतिनिधी) – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सोमवारी अकोले येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होत आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच अजित पवार अकोलेत येत आहेत. त्यामुळे या मेळाव्यातून राष्ट्रवादी अकोलेत केवळ डागडुजी करणार की पिचडांवर राजकीय तोफगोळे सोडणार याची उत्सुकता आहे.

पिचडांचा पाडाव करण्यासाठी राष्ट्रवादी इच्छुक आहे. त्यासाठी पक्ष 2014चा ‘श्रीगोंदा पॅटर्न’ अवलंबणार, अशीही चर्चा आहे. पिचड विरोधक व इच्छुकांनी एकास एक उमेदवार देण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघात सेना-भाजपची युती झाली, अथवा युती तुटली तरी वैभव पिचड हेच भाजपचे उमेदवार असतील, हे निश्‍चित मानले जाते.

शिवसेनेमधील चार इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला हजेरी लावून या जागेवर दावा केला आहे. माकपचे नेते डॉ. अजित नवले यांनी पिचड यांच्या व भाजपच्या वतीने उपभोगत असलेली पदे आधी सोडा आणि नंतरच एकास एक निवडणूकीची चर्चा करा, असा चिमटा पिचड विरोधकांना काढला होता. त्यामुळे ‘एकास एक’ ही राजकीय कवायत कशी शक्य होणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष आहे. दरम्यान, माकपने या मतदारसंघात आपण उमेदवार देणार असल्याचे जाहीर करून या चर्चेला आधीच छेद दिला आहे.

पिचड यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी अशोक भांगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या त्यांच्या पत्नी जि.प.सदस्या सुनिता भांगरे, जि.प.सदस्य डॉ. किरण लहामटे, युवा कार्यकर्ते अमित भांगरे, विनोद हांडे, अकोले नगर पंचायतच्या नगरसेविका सुभद्रा नाईकवाडी, स्वाती शेणकर आदी राष्ट्रवादी दाखल होतील, अशी चर्चा आहे.

दरम्यान पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रथमच अकोलेत राष्ट्रवादीचा मेळावा होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी आणि पिचड असेच या मतदारसंघातील समिकरण होते. मेळाव्यात पिचड विरोधाची रणनिती कशी आखली जाते, उमेदवाराची घोषणा होणार का? राष्ट्रवादीच्या मंचावर कोणकोण पिचड विरोधक गोळा होणार, राष्ट्रवादीला अकोलेत कसा प्रतिसाद मिळणार, या प्रश्‍नांबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!