कर्जमाफी : निकष निश्चितीसाठी आज बैठक

0

नगर जिल्ह्यातील डॉ.अजित नवले , धनंजय जाधव यांना आमंत्रण

अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्जमाफीच्या निकषांबाबत सुकाणू समिती आणि उच्चाधिकार समिती यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोमवार, दि. 19 जून 2017 रोजी दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक होत असून त्यात काय निर्णय होतो, याकडे तमाम शेतकरी व बँकांचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासाठी पुणतांब्यात शेतकर्‍यांच्या संपाची सुरुवात झाली होती. ठिकठिकाणी आंदोलने होऊ लागली. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेत शेतकर्‍यांना चर्चेचे आमंत्रण देत कोंडी फोडली होती. कर्जमाफीचे आश्‍वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. पण तो काहींना मान्य नसल्याने या संपाचे केंद्रबिंदू नाशिक झाले. पुन्हा ठिकठिकाणी आंदोलन पेटले. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनांचे नेते यांच्यात सह्याद्रीवर बैठक झाली.
त्यात सरसकट कर्जमाफीला निकषांसह मंजुुरी दिली. तसेच अल्पभूधारकांचे कर्ज तात्काळ माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जमाफीची अंमलबजावणी तात्काळ करणे शक्य नसल्याने सरकारने बियाण्यांसाठी शेतकर्‍यांना 10 हजारांची उचल देण्याचा निर्णय घेतला. पण ते देताना अनेक अटी लादण्यात आल्या आहेत. त्यानुसार 10 टक्के शेतकर्‍यांनाही फायदा होणार नसल्याचे शेतकरी नेते व शेतकर्‍यांच्या लक्षात आले. हेच नियम सरसकट कर्जमाफीलाही लावण्यात आले तर त्याचा काही उपयोग होणार नाही हा विचार पुढे आला.
ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री-मंडळ उच्चाधिकार समितीची 11 जून 2017 रोजी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतील प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे महसूलमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ स्थापन करण्यात आली आहे. ही समिती विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तथा शेतकरी प्रतिनिधींसमवेत थकीत कर्जमाफी निकष ठरविण्यासाठी चर्चा करणार आहे.
कर्जमाफी निकष ठरविण्याच्या चर्चेसाठी मंत्रीगटाचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंंत्री गिरीष महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते तसेच सुकाणू समितीचे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे संयोजक डॉ.अजित नवले(अकोले), बँक कर्मचारी प्रतिनिधी विश्वास उटगी, शेतकरी प्रतिनिधी धनंजय जाधव (पुणतांबा), संजय पाटील, बळीराम सोळंके (माजलगाव) यांना निमंत्रित केले आहे. या बैठकीसाठी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे व अन्य प्रमुख पदाधिकारीही रवाना झाले आहेत.
निकष कोणते असावेत यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी केंद्रीयमंत्री शरद पवार, शिवसेना नेते उध्दव ठाकरे व अन्य नेते, तज्ज्ञांशी यापूर्वीच चर्चा केलेली आहे.

सुकाणू समितीची बैठक
वीज बिल माफीची मागणी
मुख्यमंत्र्यांसमवेत होणार्‍या बैठकीत सुकाणू समितीची बैठक होणार आहे. त्यात सरसकट कर्जमाफीच्या कोणते निकष असावेत यावर चर्चा होणार आहे. कर्जमाफीबरोबच विजबिल माफी द्यावी हाही मुद्दा चर्चेला येणार आहे. चारचाकी वाहनांची नोंद असणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे सांगण्यात येते. पण शेतकरी टॅ्रक्टर व दूध, शेतमाल वाहतुकीसाठी छोटा टेम्पो, रिक्षा अशी वाहने घेतात. ते मुकणार आहेत. त्याला या समितीचा आक्षेप राहणार आहे. त्यासाठी छोटी वाहने वगळून मोठे वाहने असणारांना कर्जमाफी देऊ नये अशी मागणी करण्यात येणार आहे. आयकराचा एक मुद्दा आहे. त्यासाठी 15 लाखांपर्यंतही मर्यादा असावी असा सूर पुढे आला आहे. कर्जमाफीसाठी कुटुंबाऐवजी खातेदार अशी अट असावी. त्याचप्रमाणे शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. याच कारणामुळे शेतीचे विजेचे बिल थकलेले आहे. त्यामुळे विजबिलही माफ करण्यात यावे अशी मागणी सुकाणू समितीची राहणार आहे. यासह काही मागण्यांवर या बैठकीत एकमत करण्यात येऊन त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.  

LEAVE A REPLY

*