आज बैलपोळा; पावसाच्या दमदार आगमनामुळे उत्साह

0
नाशिक । शेतकर्‍यांना उत्साहित करणारा सण म्हणजे बैलपोळा. काबाडकष्ट करून अन्नधान्याचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांसाठी पोळा सण महत्त्वाचा असतो. आजच्या दिवशी आपला बळीराजा त्याच्या बैलांची पूजा करतो व वाजतगाज मिरवणूक काढतो.

या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना औताला जुंपत नाही. या दिवशी बैलांना अंघोळ घातली जाते व त्यांना शाल झालरींनी सजवले जाते. त्यांच्या शिंगांना रंगवले जाते. गळ्यात हार घातले जातात.

संध्याकाळच्या वेळी सजवलेल्या बैलांची ढोलतशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. काही गावांमध्ये जत्रा भरवली जाते. सर्जा-राजाला सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे, आकर्षक रंगाने केलेली सजावट, गळ्यामध्ये मणिमाळ, घुंगरमाळ, कपाळाला बाशिंग, कासरा, म्होरकी, वेसण, भोंडे, रेशम, घंटी, घुंगरे, तोडे , मुथळी, पट्टे, माळा, शिंगदोरी, शिंगगोंडा, जोते, चाबूक अशा विविध साहित्य खरेदीची लगबग दिसून आली.

खरिपाच्या मोसमात सुरुवातीला जोरदार पाऊस झाला असला तरी नंतर पावसाने उघडीप दिल्याने खरिपाच्या पिकांना पावसाच्या पाण्याची कमतरता भासू लागली आहे. अशा परिस्थितीतही पोळा उत्साहात साजरा करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*