एन्झोकेम कंपनीच्या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ 

शहर पोलिस ठाण्यात संचालक विक्रम वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल

0

येवला | दि. १६  प्रतिनिधी |

संचालक पदाचा बनावट राजीनामा तयार करुन राजीनामा पत्रावर खोट्या सह्या करीत या नंतर संगणमताने बनावट नोटरी करुन कंपनीचे शेअर्स बक्षिसपत्र म्हणून स्वत:च्या नावावर केल्यानंतर एन्झोकेम कंपनी बंद केल्याने शहर पोलिस ठाण्यात यासंदर्भात रितसर गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सप्टेंबर २०१६ पासून कंपनी बंद पडल्याने कंपनीच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने कामगारांनी देखील कामगार आयुक्तांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

संपूर्ण आशिया खंडात पपेन निर्मितीसाठी विख्यात असलेली तालुक्यातील कोटमगाव येथील एन्झोकेम कंपनी प्रा. लि. या कंपनीच्या कामगारांवर सद्या उपासमारीची वेळ आली आहे. सन १९५९ साली स्थापन झालेल्या या कंपनीला दोन वेळेस राष्ट्रपती पुरस्कार तर २५ वेळेस निर्यातीसाठी पुरस्कार मिळाला असून पपेन निर्मितीत आशिया खंडात क्रमांक एकची ही कंपनी आहे.

सद्या या कंपनीचे २० कामगार कंपनी बंद असल्याने घरी बसून आहेत. तर कायमस्वरुपी नेमणुकीवर असलेले १५ कामगार कंपनी सोडून गेले आहेत. शहर पोलिस ठाण्यात कंपनीच्या संचालिका राधाबाई सत्यनारायण वर्मा यांच्या फिर्यादीनुसार कंपनीचे संचालक आरोपी विक्रम सत्यनारायण वर्मा, मिनल विक्रम वर्मा, सम्राट विक्रम वर्मा तसेच कृष्णा एंझीटेक कंपनीचे कर्मचारी योगेश बोंद्रे या चार जणांविरोधात संगणमताने फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वर्मा कुटुंबियाने अटकपुर्व जामिन घेतला आहे.

तर योगेश बोंद्रे या कर्मचार्‍याची अटके नंतर सद्या जामिनावर सुटका झाली आहे. राधाबाई वर्मा यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विक्रम वर्मा यांच्यासह चौघांनी कंपनीच्या संचालक पदाचा राधाबाई वर्मा यांचा बनावट राजीनामा तयार करुन खोट्या सह्या या राजीनामा पत्रावर केल्या व हा राजीनामा खरा म्हणून ग्राह्य धरीत राधाबाई वर्मा यांचे कंपनीचे संचालक पद विक्रम वर्मा यांनी रद्द केले.

यानंतर राधाबाई वर्मा यांच्या नावावरील एकूण २ हजार ४०० शेअर्स चौघा संशयित आरोपींनी संगणमताने बनावट नोटरी करुन, नोटरीवर खोट्या सह्या करुन विक्रम वर्मांच्या नावे बक्षिसपत्र केले व फसवणुक केली, अशी तक्रार फिर्यादीत राधाबाई वर्मा यांनी केली आहे. शहर पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम वर्मा यांनी स्वत:ची कृष्णा एंझीटेक ही कंपनी सुरु करुन तिला नावारुपाला आणण्यासाठी एन्झोकेम कंपनीची स्पर्धा नको म्हणून स्वत:च्या अधिकारात आईचे अधिकार काढीत एन्झोकेम ही कंपनी बंद केली. कंपनीला कच्चा माल येवू न दिल्याने सदर कंपनीचे उत्पादनही थांबल्याने कामगारांना सद्या घरी बसावे लागले आहे.

ऑगस्ट २०१६ पासून कामगारांना पगारही मिळालेला नसल्याने उपासमारीची वेळ सद्या कंपनीच्या कामगारांवर आली आहे. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील या संदर्भात अधिक तपास करीत असून हस्ताक्षर तज्ञांकडे राजीनामा पत्र व शेअर्स बनावट नोटरीवरील सह्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

कंपनी बंद केल्याने बँकेचे व कंपनीचे इतर सर्वच व्यवहार ठप्प झाले असून कंपनीला थकित कर्जा विषयी नोटीसा प्राप्त झाल्या आहेत. आशिया खंडातील क्रमांक एकची ही कंपनी मरु द्यायची नाही म्हणून कायदेशीर लढा सुरु आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने कंपनी सुरु करण्यासाठी आईची तळमळ सुरु आहे.
– भारत वर्मा, संचालक, एन्झोकेम कंपनी प्रा. लि.

LEAVE A REPLY

*