तीन आमदार बोगस आदिवासी!; माजी मंत्री पिचड, वळवींचा आरोप

0
नाशिक | शासनाने रक्तांच्या नात्यातील लोकांना जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबत नियमात शिथिलता आणली. परंतु रक्त नात्यावर आधारित जात वैधता प्रमाणपत्र देणे ही घोडचूक असून, मुख्यमंत्र्यांनी प्रथम बागलाणच्या राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण, गडचिरोलीचे भाजपचे आमदार कृष्णा गजबे आणि चोपड्याचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांची जात पडताळणी प्रमाणपत्र तपासणी करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी केली.

नाशिक विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना दोन्ही माजी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जात वैधता प्रमाणपत्राबाबत आणि बोगस आदिवासींच्या प्रमाणपत्र तपासणीबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची मागणी केली. बोगस आदिवासींची तपासणी तर केलीच जात नाही, पण बोगस जात वैधता प्रमाणपत्रांद्वारे आमदार झालेल्यावर तर कारवाई करा.

तेव्हा कुठे पारदर्शक कारभार सुरू असल्याचे म्हणता येईल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी माझ्यावर बोगस आदिवासीचा आरोप केला. तेव्हा मी सर्वौच्च न्यायालयातून मी खरा आदिवासी असल्याचे सिध्द केले. पण त्यांना साधे उच्च न्यायालयातही ते आदिवासी असल्याचे सिध्द करता येत नाही. चव्हाण या भाट ठाकूर आहेत.

पण त्यांच्याकडे आदिवासी ठाकूर आहे. त्यामुळे त्या आदिवासी नसल्याचे सांगत पिचडांनी चव्हाणांवर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. तर पद्माकर वळवी यांनी चोपड्याचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे कोळी आहेत, ते एसबीसीमध्ये मोडतात, पण त्यांच्याकडे टोकरे कोळीचा दाखला आहे.

त्यामुळे ते बोगस आदिवासी आहेत. त्याप्रमाणे गडचिरोलीचे भाजपचे आमदार कृष्णा गजबे हे कुणबी मान अर्थात कुणबी पाटील म्हणजे बिगर आदिवासी असून त्यांचा दाखला मात्र गोंड माना या जातीचा आहे. त्यामुळे ते बोगस आदिवासी असून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे. तेव्हाच राज्यातून बोगस आदिवासी हा आदिवासींतून हद्दपार होईल, अशी अपेक्षाही वळवी यांनी व्यक्त केली.

ठाकूर बनले जमिनी घेण्यासाठी आदिवासी : विश्वास सहकारी बँकेचे विश्वास ठाकूर हे बोगस आदिवासी आहेत. त्यांनी जमिनी घेण्यासाठी बोगस दाखला मिळवला आहे. ठाकूर आडनाव हे आदिवासींमध्ये नाही. पण ठाकूर यांनी भाट ठाकूर नावाने बोगस दाखला घेतल्याचा आरोप पद्माकर वळवी यांनी केला. विशेष म्हणजे ठाकूर यांच्या बहिणीला नाशिक समितीने वैधता प्रमाणपत्र नाकारले आहे.

औरंगाबाद उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. त्यांची सख्खी बहीण आदिवासी नसेल तर विश्वास ठाकूर कसे असतील? असा सवाल उपस्थित करत वळवी यांनी केवळ आदिवासी जमिनी नावावर करण्यासाठी आणि पेट्रोलपंप खोटे प्रमाणपत्र दाखवून लाटण्यासाठीच हा सारा प्रकार केला आहे. त्यामुळे त्यांच्याही जातीच्या आणि जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी करावी, अशीही मागणी यावेळी वळवी यांनी केली.

LEAVE A REPLY

*