सुरक्षेसाठी तीन दिवस सप्तश्रृंगी दर्शन बंद?

0
नाशिक | दि. १३ प्रतिनिधी- उत्तर महाराष्ट्रातील आराध्य दैवत व साडेतीन शक्तीपीठापैकी ंअर्धेपीठ असलेल्या वणी येथील श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सोमवारी सायंकाळी मोठी दरड कोसळली. मात्र मंदिरावर संरक्षक जाळया बसवण्यात आल्याने हे दगड जाळयांमध्ये अडकून पडल्याने मोठा अनर्थ टळला. हे दगड काढण्यासाठी तंत्रज्ञांनी आज पाहणी केली. मात्र हे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.

मात्र काम सुरू असतांना मंदिर बंद ठेवावे लागणार आहे. म्हणून काम सुरू असताना पुढील आठवड्यात सप्तश्रृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी तीन दिवस बंद ठेवण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे.  गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर एका खोबणीत आहे. मंदिरावरील भागात दरडी कोसळण्याचा धोका सतत वर्तवण्यात येत असल्याने मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती.

अलीकडेच गडावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे सुरक्षिततेला अधिक महत्त्व देत मंदिरावरील गडाच्या भागास संरक्षित जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दरड कोसळली तरी ती मंदिरावर न पडता जाळीत अडकते. त्यामुळे संभाव्य धोका टळतो.

दोन दिवसांपासून गडावर मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे झीज झालेला सुमारे पाचशे किलो वजनाचा दगड मंदिराच्या दिशेने खाली कोसळला. त्यामुळे मोठा आवाज झाल्याने मंदिर विश्‍वस्त व भाविक भितीपोटी रस्त्यावर आले. परंतु कुठलीही हानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

ही संरक्षक जाळी नसती तर दरड सरळ मंदिराच्या परिसरात कोसळली असती व मंदिराची मोठ्या प्रमाणात हानी झाली असती. मात्र या घटनेनंतर काही काळ मंदिरात जाण्यास कोणी भाविक तयार नव्हते. कालांतराने दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले.

ज्या कंपनीमार्फत ही संरक्षक जाळी बसवण्यात आली आहे त्या कंपनीच्या अधिकार्‍यांना याबाबत कळवण्यात आले आहे. आज या कंपनीच्या काही अधिकार्‍यांनी गडावर पाहणी केली. याबाबतचा अहवाल तयार करण्यात येत असून पुढील आठवड्यात साधारणपणे १७ ते १९ जून या काळात हा दगड काढण्यात येणार असल्याचे समजते.

मात्र हे काम करताना सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर बंद ठेवण्याचा विचार प्रशासन करत आहे. त्यामुळे सुमारे तीन दिवस भगवतीचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

धोकादायक दगड काढणार
मंदिरावरील संरक्षक जाळीत अडकलेला दगड सुमारे पाचशे किलो वजनाचा असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे हा दगड जागेवरच फोडण्यात येणार आहे.

हे काम करण्यासाठी सुमारे तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडावरील डोंगरात पावसामुळे काही दगडांची झीज झाली आहे.

त्यामुळे पावसाळयात सातत्याने दरड कोसळण्याच्या घडत असतात. मात्र जाळीमुळे हानी टळत असली तरी वारंवार अशा घटना घडू नयेत म्हणून संपूर्ण डोंगराची पाहणी करून धोकेदायक दगड काढण्याचा विचार प्रशासन करत आहे.

LEAVE A REPLY

*