Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशुक्रवारपासून  तीन दिवस सार्वजनिक बँका बंद राहणार; अधिकारी व सेवक संघटनांचे देशव्यापी आंदोलन

शुक्रवारपासून  तीन दिवस सार्वजनिक बँका बंद राहणार; अधिकारी व सेवक संघटनांचे देशव्यापी आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील अधिकारी आणि सेवक आपल्या प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवार (दि.३१) पासून दोन दिवसांचा संप पुकारणार आहेत. त्यामुळे रविवार (दि.२ ) पर्यंत देशातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज तीन दिवसांसाठी बंद राहणार आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आपली बँकेची कामे उद्या (दि.३०) पर्यंत उरकून घ्यावी लागणार आहेत.

- Advertisement -

वेतनवाढीच्या मागणीसह सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी देशभरातील बँकांशी संबंधित अधिकारी आणि सेवकांच्या जवळपास १० संघटना एकत्र आल्या असून दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. दि.३० जानेवारी व दि.१ फेब्रुवारी रोजी म्हणजेच येत्या शुक्रवारी आणि शनिवारी हा संप करण्यात येणार असून जोडून रविवारी सुट्टी असल्याने तीन दिवस बँकांचे कामकाज कोलमडणार आहे.

सार्वजनिक बँकांच्या या संपामुळे थेट सोमवारीच कामकाज होणार असल्याने ग्राहकांना त्यांची बँकेची कामे गुरुवार पर्यंत आटोपून घ्यावी लागणार आहेत. दि. १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून पहिला शनिवार असल्याने तो बँकांसाठी कामकाजाचा दिवस आहे.

मात्र बँक अधिकारी व सेवक संपावर ठाम असल्याने ऐन अर्थसंकल्पावेळी देशातील सार्वजनिक बँक बंद असणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारी (दि. ३१)  संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील व दुसऱ्याचं दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

‘बजेट’च्या काळात  कर्मचारी संघटनांच्या संपामुळं आठवडाअखेर तीन दिवस बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहे. ‘इंडियन बँक असोसिएशन’सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने  बँकांच्या एकीकृत संघटनांनी या दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या