Type to search

maharashtra धुळे फिचर्स मुख्य बातम्या

धुळे जिल्ह्यात तिघा भावंडांचा बुडून मृत्यू

Share

सोनगीर  –

चिमठावळ (ता.शिंदखेडा) येथील तीन विद्यार्थी पाण्यात बुडून मयत झाल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तीनपैकी दोन सख्खे भाऊ व एक चुलत भाऊ होता. पाळलेल्या शेळ्यांचे चारा आणण्यासाठी तिघे शेतात गेले होते. प्रत्यक्षदर्शी कोणी नसला तरी जवळपास काठोकाठ भरलेल्या विहिरीत पाणी पिण्यासाठी एक जण गेला असावा व तो पाण्यात पडल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्नात उर्वरित दोन्ही पाण्यात पडून मृत्यूमुखी पडले असावेत असे सांगण्यात आले. गौरव लीलाधर जाधव (वय 17), दीपक लीलाधर जाधव (वय 11) व दीपक ज्ञानेश्वर जाधव (वय 15) असे मयत मुलांची नावे आहेत.

चिमठावळ येथील गौरव व दोन्ही दीपक हे तीन जण 4 वाजेच्या सुमारास गावाजवळील उत्तरेला सुमारे 500 मीटर अंतरावरील स्वतःच्या शेतात चारा घेण्यासाठी सायकलवर गेले होते. सायंकाळी 6 वाजून गेले तरी ते परत न आल्याने गौरवचे काका शेतात पहाण्यासाठी गेले असता, त्यांना ते दिसून आले नाही.

पण विहिरीपासून काही अंतरावर शेतात सायकली उभ्या असलेल्या दिसून आल्या. त्यांना संशय आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा पाण्यावर एकाची चप्पल तरंगताना दिसून आली. ते धावतच गावात आले. त्यांनी गौरव व दीपकचे वडील लीलाधरला ही घटना सांगितली. ते शेतात गेले. त्यांचे नातेवाईक मनोहर पाटील व नितीन पाटील यांनी विहिरीत उडी घेतली.

त्यांनी एक-एक करीत तिघांना बाहेर काढले. तीनही मयत मुलांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉ. किरणकुमार निकवाडे यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदन सकाळी करण्यात येणार आहे.गौरव हा अकरावीला (शास्त्र) येथील एन.जी.बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होता. त्याचा लहान भाऊ दीपक हा येथील आनंदवन माध्यमिक विद्यालयात सहावीचा विद्यार्थी होता.

चुलतभाऊ दीपक हा सोंडले आश्रमशाळेत नववीत शिकत होता. लीलाधर जाधव येथील विठ्ठल रखुमाई पतसंस्थेत शिपाई म्हणून कार्यरत असून दररोज ये-जा करायचा व मुलांना शाळेत घेऊन यायचा. त्यांना दोन मुले व दोन्ही मयत झाले. ज्ञानेश्वर जाधव हे बांधकाम ठेकेदाराच्या हाताखाली काम करतात. त्यांना हा एकुलता मुलगा व एक मुलगी आहे. दोन्ही परिवार गरीब कुटुंबातील आहेत. तिनही विद्यार्थी पाण्यात बुडून मयत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!