‘आणीबाणी’लादणार्‍यांकडुन असंहिष्णुतेची भाषणेे – डॉ. स्वामी

0
नाशिक । कॉग्रेस पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणिबाणी लादत कोणतीही चर्चा न करता, समन्स न पाठविता आणि कोणतेही आरोपपत्र न्यायालयात न दाखल करता 1 लाख 40 हजार नागरिकांना कारागृहात डांबले होते, ही असंहिष्णुता नव्हती का ?, यावर अद्यापही कॉग्रेस देशाची माफी मागायला तयार नाही.

आता हेच लोक असंहिष्णुतेचे भाषण देत आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय नेते खा. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आज केले.

शहरातील शंकराचार्य कृतकोटी सभागृहात हिंदुस्थान प्रकाशन संस्था आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत संहिष्णुता : सत्य कि आभास या विषयावर आयोजीत व्याख्यानात डॉ. स्वामी बोलत होते. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, विश्वस्त रमेश गायधनी व शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष डॉ.आशिष कुलकर्णी उपस्थित होते.

ब्रिटीशांनी भारताला स्वांतत्र दिल्यानंतर एकसंघ भारत बनविण्यासाठी मुक्त झलेल्या 600 पैकी 500 राजांना एकत्र आणण्याचे काम करणारे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतरत्न दिला नाही. मात्र पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी 1954 मध्ये स्वत:लाच स्वत:नी भारतरत्न पुरस्कार घेतला असे सांगत डॉ. स्वामी म्हणाले, कॉग्रेसला पटेल यांच्याबाबत कायम आकस होता.

तर देशाचे संविधान बनविणारे डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे काम झाले. ही असंहिष्णुता नव्हती का ? आता हेच लोक आज असंहिष्णुतेचे भाषण देत आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येत नथुराम गोडसेच्या जबाबात आपण दोन गोळ्या झाडल्याचे म्हटले आहे, तर पोलीसांनी तपासात 4 गोळ्या झाडल्याचे नमुन केले आणि सरकारी वकील यांच्या म्हणण्यानुसार गांधी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या गेल्या. परंतु हत्या झाल्यानंतर गांधी यांचे शवविच्छेन झाले नाही.

तसेच गोळीबार केल्यासंदर्भात बॅलेस्टीक रिपोर्ट देखील आला नाही. घटनेनंतर 40 मिनीटे गांधीजी जीवंत होते, त्यांना रुग्णालयात का देण्यात आले नाही ? असा प्रश्न उपस्थित करीत या हत्येचा सर्वात मोठा फायदा जवाहरलाल नेहरू यांना झाल्याचा आरोपही डॉ. स्वामी यांनी केला.

देशात भाजपा सत्तेवर आल्यानंतरच असंहिष्णुता वाढली असे वातावरण निर्माण केले जात असल्याचे सांगत डॉ. स्वामी म्हणाले, कॉग्रेस बरोबर अलिकडच्या काळात पुरस्कार परत करणारे सर्वजण बोगस आहे.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जे काही घडले, त्यामुळे विद्यार्थ्यांना कारागृहात टाकले. कायद्यात प्रत्येकाला मुलभूत अधिकार आहे, मात्र जेव्हा देशाच्या सुरक्षितता, सार्वभौमता, नैतिकता यास आव्हान देण्याचे काम केले जाते, तेव्हा या मुलभूत अधिकाराला अंकुश ठेवण्याची तरतुद संविधानात आहे.

त्यानुसारच प्रशासनाकडुन कारवाई केली जात आहे. भाजप हे पहिले सरकार आहे की, ज्यांनी ट्रीपल तलाकवर चर्चा घडवून आणण्याची हिम्मत केली. मुसलीम महिलांच्या मुक्तीसाठी पाऊल उचलले जाणार आहे. अल्पसंख्याक असलेल्या शिया यांना भाजपचे सरकार आल्याने हिम्मत आली आहे. मानवता अधिकार विरुध्द कोणी जात असेल तर अंकुश ठेवण्याचे काम कायदा करणार आहे.

इंग्रज हिंदुस्तानात आले नसते तर देशात मराठा राज्य स्थापित झाले असते, असे सांगत डॉ. स्वामी यांनी ब्रिटीशांच्या काळात देशाचा खोटा इतिहास लिहण्याचे काम झाले असुन तो बदलला गेला पाहिजे. आता आम्ही हिंदुंना एक आणण्याचे काम करीत असुन अल्पसंख्यांना देखील सोबत घेत आहे. काही लोक धर्म, जात, प्रांतात वाद लावुन असहिष्णुता असल्याचे सांगत आहे. देशातील सर्व जनतेचा डीएनए एकच असल्याचे सिद्द झाल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रारंभी आणीबाणीच्या असहिष्णू पर्वातील लढ्याचे विजयी सेनानी डॉ. .सुब्रमण्यम स्वामी यांचा नाशिककर नागरिकांच्या वतीने महापौर सौ.रंजना भानसी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आणीबाणीत 18 महिने कारावास भोगलेल्या सत्यागृही डॉ. झुबर हिरामण भंंदूरे यांचा प्रातिनिधिक सत्कार डॉ. स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ.आशिष कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

*