Type to search

Featured सार्वमत

विखेंपाठोपाठ थोरातही दक्षिणेत सक्रीय

Share

एकमेकांचे उट्टे काढण्याचा कार्यक्रम : संघर्ष तीव्र होणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – काही दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नगर लोकसभा मतदारसंघात युतीच्या नेत्यांच्या भेटीगाठीसाठी सक्रीय झाल्यानंतर सोमवारी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आ.बाळासाहेब थोरातांनी दक्षिणेत आगमन करत विखेंवर निशाणा साधला. विखेंनी काँग्रेसला धोका दिला, असा आरोप त्यांनी केला आहे. उत्तर नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे-थोरात संघर्ष टोकाचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तो अधिकच उफाळून आला आहे. विखे गटाकडून थोरातांवर टीका झाल्यानंतर थोरातांनीही विखेंना लक्ष्य केले आहे. काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते विखे आपले पुत्र सुजय यांच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. त्यांनी यासाठी भाजपा-सेना नेत्यांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत.

सोमवारी डॉ.सुजय विखे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ना.विखे गेले नाहीत. मात्र ते नगरमध्येच होते. सायंकाळी माध्यमांशी बोलताना ‘सुजय काही चुकीचा निर्णय घेईल, असे मला वाटत नाही.’ अशी पाठराखण त्यांनी केली. युतीचे सर्व नेते त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्यात आत्मविश्‍वास आहे. त्यामुळे त्यांना काही अडचण आहे, असे दिसत नाही. आजवरच्या राजकीय वाटचालीत माझे मार्गदर्शन डॉ.सुजय यांना मिळालेच आहे, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

ना.विखे नगरमध्ये तळ ठोकून असताना आ.थोरात यांनी आघाडीसाठी श्रीगोंदा, कर्जत व जामखेडमध्ये कार्यकर्ता मेळावे घेतले. या मेळाव्यांमध्ये बोलताना त्यांनी विखेंना थेट लक्ष्य केल्याने दोघांतील संघर्ष अपेक्षेप्रमाणे प्रचार काळात अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. आ.थोरात म्हणाले, असा बालहट्ट मी पाहिला नाही. त्यांना काँग्रेसकडून काय मिळाले नाही? तरीही काँग्रेसला धोका दिला. त्यांच्या जाण्याने काँग्रेसच्या वाढीला बळ मिळाले. आता पक्ष जोमाने वाढेल, असा दावा त्यांनी केला. उत्तरेतून एखादी ‘यंत्रणा’ तुम्हाला मतदान कसे करायचे हे शिकवायला आली असेल. त्यांना जिथे नोकरी करता तेथे पगार मिळाला का, एवढेच विचारा असा चिमटाही आ.थोरातांनी काढला. त्यांनी आपल्या टीकेचा रोख पूर्णपणे विखेंकडे वळविल्याचे मेळाव्यांतील भाषणांतून समोर आले. दरम्यान, दक्षिणेतील सभांमधून विखे गटानेही वारंवार थोरातांवर टीका करत आव्हान दिले होते. त्यामुळे विखे-थोरात संघर्षाचा सामना अधिकच तीव्र होणार असल्याचे मानले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!