Blog – हवामानखात्याचा मॉन्सून अंदाज यंदा चुकला

0

हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडी चा यंदाचा मान्सून अंदाज चुकला आहे. पूर्वमान्सून पावसालाच मान्सून चा पाऊस सांगत त्यामुळे नाईलाजाने मान्सून ब्रेक जाहीर करण्याची वेळ हवामान खात्यावर आली .

हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर केरळमधील आठ केंद्रांवर 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचे आगमन होते.

दरवर्षी 10 मे नंतर मिनिकॉय, अमिनी, तिरुअनंतपुरम, पुनालुर, कोल्लम, अल्लापुझ्झा, कोट्टयम,कोची, त्रिसूर, कोझिकोडे, थालासेरी, कन्नुर, कुडुलु आणि मंगलोर या वेधशाळांच्या क्षेत्रापैकी किमान आठ ठिकाणी सलग दोन दिवस 2.5 मि.मी. किंवा त्याहून अधिक पाऊस पडल्यास केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले, असे जाहीर केले जाते. सागर आणि मेकुणू या दोन वादळांच्या प्रभावाने केरळला जोरदार झालेल्या पावसामुळे, मान्सून लवकर आल्याची घोषणा उतावीळपणे हवामान खात्याने केली.

वास्तविक राज्यात मान्सून आलेला नसतांनाच मान्सून पूर्वपाऊस हा मॉन्सूनचा दाखविण्याचा अट्टाहास हवामान खाते का करीत आले आहे? असा चुकीचा अंदाज जाहीर करून हवामान खात्याने शेतकऱ्यांना संभ्रमित केले आहे तसेच संकटात टाकले आहे.

भारतीय हवामान खात्याने एप्रिल आणि मे महिन्यामध्ये यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तवताना सरासरीच्या 97 टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर शेतकर्‍यांमधून तसेच संपूर्ण देशामधून आशादायक वातावरण तयार झाले. सर्वांनाच दिलासा देणारे हे अंदाज होते; पण अंदाज आणि वास्तव यांचा ताळमेळ घालणे आवश्यक असते.

तसेच केवळ मान्सूनने सरासरी गाठली म्हणजे तो देशासाठी, शेतीसाठी आणि पर्यायाने सर्वसामान्यांसाठी उपकारक ठरतो, असे नाही. त्याचे आगमन, वितरण या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये बदल झाल्यास शेतकर्‍यांचे अर्थगणित कोलमडते. पेरणीच्या अंदाजातली चूक एकूण भारतीय शेतकर्‍याचा विचार करता, फार धोक्याची आणि दूरगामी वाईट परिणाम करणारी ठरू शकते.

शेतकर्‍यांच्या शेतीवर आणि पेरणीसाठी आणि शेत मशागतीसाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च यामुळे वाया जाऊ शकतो. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि आत्महत्या याची जबाबदारी हवामान खाते घेणार आहे का?

प्रत्यक्षात मान्सूनचा पाऊस येणे बाकी असतांना, हवामान खात्याने जाहीर केलेल्या मान्सूनच्या सद्यःस्थितीतील आलेखाच्या हिरव्या रेषा मान्सूनची अचानक प्रथम पश्‍चिमेला केरळमध्ये आगेकूच आणि नंतर म्हणजे वादळांचा प्रभाव ओसरल्यावर पूर्वेला मान्सूनची आघाडी, तर त्याच वेळी पश्‍चिमेला मान्सूनमध्ये ‘ब्रेक’असे चित्र दर्शविते. २०१९ च्या निवडणुकीमुळे खोटा अंदाज जाहीर करण्यासाठी राजकीय दबाव हवामान खात्यावर असावा का?

केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आदी राज्यांतील शेतकर्‍यांनी 85 मिलीमीटर पावसाच्या नंतरच योग्य वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले, तरच पेरणी करावी. जेव्हा शेतात सरासरी 80 ते 85 मिलीमीटर पाऊस पडतो, तेव्हा शेतातील ढेकूळ फुटतात. ढेकूळ फुटल्याशिवाय पेरणीकरू नये; अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवले जाऊ शकते. शेतकर्‍यांनी संभ्रमित न होता आभासी नव्हे, तर खर्‍या मान्सून आगमनाची वाट पाहावी. मान्सूनच्या पावसात विजा आणि गडगडाट नसतो. ढगांचे पुंजकेदेखील दिसत नाहीत. वातावरणात अस्थिरता नसते. पाऊस संततधार पडतो. मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरून येते. पावसाची सतत रिपरिप सुरू होते. मधे ऊनही पडत नाही. या सर्व गोष्टी सध्या दिसत नाहीत. मान्सून आलाय, पण पाऊस गायब असे चित्र आहे. गेल्या काही वर्षांत मान्सूनचा पॅटर्न बदलत चालला आहे; सजग होऊन याकडे लक्ष दिल्यास त्याचा फटका बळीराजाला बसणार नाही.

-किरणकुमार जोहरे, मोबाइलः 9970368009, email: kkjohare@hotmail.com

(लेखक  भारतीय उष्णदेशीय हवामान शास्त्र संस्था (आय आय टी एम ), पुणे चे माजी शास्त्रज्ञ आहेत.)

LEAVE A REPLY

*