Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कचरा नव्हे, हे तर सोने – सुप्रिया आगाशे

Share

किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचा उत्साहात समारोप

नाशिक  | प्रतिनिधी

पर्यावरण प्रेमी तथा घराच्या गच्चीवर गांडूळ खताचा वापर करत बाग फुलवणाऱ्या सुप्रिया आगाशे यांची जैविक कचरा व्यवस्थापन या विषयावर किर्लोस्कर कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. एनर्जी ट्रान्सफॉर्मर या फिल्मद्वारे आगाशे यांनी स्वयंपाक घरातील कचऱ्यापासून गांढूळ खत तयार करण्याच्या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. आगाशे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपण नेमका किती कचरा उत्पन्न करतो. त्याचा आपण कसा उपयोग करावा हे सांगताना त्यांनी हा कचरा नव्हे तर सोने आहे असे एका चित्रफितीसह पटवून दिले.

गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरात सुरू असलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीच्या परिसरातील अस्मिता सभागृहात झालेल्या कार्यक्रमाद्वारे समारोप करण्यात आला.

माझे काम बघून परिसरातील 25 हून अधिक महिलांनी असा प्रकल्प सुरू केला असल्याचे आगाशे यांनी सांगितले. ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम होत असताना आगाशे यांच्यासारखे कचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिक वस्तूंच्या पुनर्वापर यांचे कौतुक करताना 2015 साली किर्लोस्कर वसुंधरा सन्मान पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.

महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव म्हणाले की, गेल्या एक दशकापासून हा महोत्सव नाशिकमध्ये सुरू आहे. महोत्सवानिमित्त शहरात सुरू असलेले उपक्रम बघून आजच सकाळी फोन करून त्रिपुरा राज्यातून काही पर्यावरण प्रेमींनी असे उपक्रम राबविण्याची इच्छा व्यक्त केली. वसुंधरा महोत्सवातील वर्षभर चालणाऱ्या इको रेंजर्स या उद्यमी उपक्रमात विविध कॉलेजेसची तरुण मंडळी विविध कामे करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांच्या येत्या 2 ऑक्टोबर पासून प्लॅस्टिक बंदीच्या घोषणेचे स्वागत करताना वैयक्तिक पातळीवर प्लॅस्टिक विरोधात लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव, हेमंत बेळे, अमित टिल्लू, किर्लोस्कर कंपनीचे प्रकल्प प्रमुख मकरंद देवधर, उदय बक्षी, परेश जोशी, देवेंद्र देवरे, राहुल बोरसे, सुप्रिया आगाशे, किर्लोस्करचे कर्मचारी उपस्थित होते. सिद्धेश सिन्नरकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार किर्लोस्कर फॅक्टरी मॅनेजर राहुल बोरसे यांनी मानले.

चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांकडून समोर आल्या प्लॅस्टिक बंदी बाबतच्या कल्पना

महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सकाळी चांदशी येथील अशोका ग्लोबल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकला नकार, वसुंधरेला होकार या महोत्सवाच्या घोषणेच्या विषयावर आपल्या मनातील कल्पना, सर्जनता यांचा वापर करून चित्र रेखाटली.

मनातील चित्रच कागदावर उतरवत रंगमाध्यमांत रंगांच्या विविध छटांत, शेडिंगचा वापर करून चित्र रंगवून पूर्ण केली. मुले चित्र रेखाटत असताना त्यांच्या भावविश्‍वातील आनंद, दुःख, राग, लोभ या सर्व भावनांना वाट करून देत पर्यावरणाविषयी असलेली आपली जाण कागदावर उतरवली असल्याचे जाणवले असे मत शाळेच्या प्राचार्या सुदिता दत्ता यांनी व्यक्त केले.

इयत्ता चौथी ते सहाचेे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. प्रत्येकाने अप्रतिम वर्णन करणारी चित्रे काढल्याने सगळ्यांनाच उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आले. यावेळी उपप्राचार्य अनुपमा पंडित, कला शिक्षिका आरती बिजलानी, किर्लोस्कर आणि वसुंधराचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!