तेरा हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार

विविध सरकारी योजनांमधून मिळाली घरकुले

0

 

नाशिक | दि. ३१ प्रतिनिधी- जिल्ह्यात विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत १३ हजार २५१ कुटुंंबांना हक्काचे घरकुल मिळाले. त्यापैकी ६ हजार ९२६ घरकुल इंदिरा आवास योजनेअंतर्गत तर ४ हजार ७९८ घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आले आहेत.

इंदिरा आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्य्ररेषेखालील बेघर किंवा कच्चे घर असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येतो. २०१३-१४ पासून घरकुलाची किंमत एक लाख रुपये करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दारिद्य्ररेषा हा निकष नसून सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षण २०११ नुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. १ एप्रिल २०१६ पासून बेघर आणि पक्के घर नसणार्‍या ४ हजार ९४५ कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून हक्काचे घरकुल मिळाले आहे. लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी पहिला हप्ता अग्रीम स्वरुपात आणि त्यानंतर तीन हप्त्यात घरकुलाचे अनुदान त्याच्या बँक खात्यात जमा केले जाते.

चौदा हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत केंद्र शासनाकडून लाभार्थ्यास घर बांधण्यासाठी १ लाख २० हजार अनुदान देण्यात येते. याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामासाठी मनुष्य दिवस उपलब्ध करून दिले जातात.

याशिवाय अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेतून २०१६-१७ मध्ये ५०९ लाभार्थ्यांना तर शबरी घरकुल योजनेतून एक हजार अनुसूचित जमाती लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. पारधी घरकुल योजनेतूनदेखील अनुसूचित जमातीच्या ९ लाभार्थ्यांना घरांसाठी अनुदान देण्यात आले असून त्यांना हक्काचे घर मिळाले आहे.

‘इंदिरा आवास’चे लाभार्थी
२०१५-१६ मध्ये सर्वाधिक ७४२ घरकुल दिंडोरी तालुक्यात बांधण्यात आले. बागलाण तालुक्यात ६६१, कळवण ६५८, सुरगाणा ५९१ आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात ५९६ घरकुले बांधण्यात आली आहेत.

‘पंतप्रधान आवास’चे लाभार्थी
बागलाण तालुक्यात ४२३, चांदवड २४४, देवळा १००, दिंडोरी ६९८, इगतपुरी १७७, कळवण ४०७, मालेगाव ५३३, नांदगाव २०९, नाशिक ३२४, निफाड ३६९, पेठ २१७, सिन्नर १५४, सुरगाणा ४०६, त्र्यंबकेश्‍वर २७६ आणि येवला तालुक्यात २६१ कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळाले आहे.

LEAVE A REPLY

*