Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सराफाला लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात

Share

मांजरी (वार्ताहर) –  राहुरी तालुक्यातील मांजरी येथील सराफाचे दुकान आटोपून घरी परतणार्‍या नेवासा तालुक्यातील खेडले परमानंदच्या निखील बाळासाहेब आंबिलवादे या सराफाला डोळ्यात मिरचीची पूड टाकून सुमारे 40 तोळे सोने आणि दोन किलो चांदी असा सोळा लाख रुपयांचा ऐवज लुटून नेणारे लुटारू एलसीबीच्या जाळ्यात आले आहेत. हे आरोपी श्रीरामपूर भागातील असल्याची माहिती उपलब्ध झाली असून या गुन्ह्याचा उलगडा आज-उद्या होण्याची शक्यता आहे.

आंबिलवादे यांचे राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सराफी दुकान आहे. ते रोज खेडल्यावरून मांजरी येथे ये-जा करत असतात. काल सायंकाळच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकानाचे कामकाज आटोपून मंगळवारी (दि.21) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील खेडले येथे दुचाकीवर पानेगाव-सोनई-खेडले रस्त्याने जात असताना तीन अज्ञात तरुणांंनी दुचाकीवरून येऊन आंबिलवादे यांना रस्त्यातच नदीकाठाजवळ थांबवून त्यांना रस्ता कोठे जातो? असे विचारले. त्यावर दुसर्‍या तरुणाने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि हल्ला चढविला. निखील यांना काही समजण्याच्या आत त्यांच्या दुचाकीला अडकविलेली सोन्या-चांदीचा ऐवज असलेली बॅग हिसकावून घेत पोबारा केला होता.

घटनेनंतर आंबिलवादे यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जबाबावरून आणि त्यांच्याकडे उपलब्ध पावत्यांवरून दुसर्‍या दिवशी 20 तोळे सोने आणि पाऊण किलो चांदी लुट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरदिवसा आणि मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने पळविण्याची घटना घडल्याने घबराटीचे वातावरण होते. या लुटीची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन तपासाची चक्रे तातडीने फिरविली. या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अन्य आरोपी आणि सोने कुणाला विकले याचा रात्री उशीरापर्यंत शोध घेणे सुरू होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!