Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

येवल्यातील चारा छावण्या वाऱ्यावर; जनावरांना प्यायला पाणीच नाही

Share

विखरणी | वार्ताहर

तालुक्यातील येवला-मनमाड महामार्गावर विसापुर येथे चारा छावणी सुरू असून या चारा छावणीत एकूण 63 जनावरे आहेत. या जनावरांना अशोक बाबा गोशाळा या संस्थेच्या माध्यमातून चारा पाण्याची व्यवस्था केली जात आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे अशी मागणी अनेकदा करूनही शासकीय अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.

यथील चारा छावणीसाठी त्वरित टँकर सुरू करून जनावरांची तहान भागवावी अशी मागणी केली जात आहे. विसापुर फाटा येथे जनावरांसाठी गत पाच वर्षांपासून चारा छावणी सुरू असून कोणत्याही शासकीय मदतीविना ही चारा छावणी सुरू आहे.

परीसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने जानेवारी अखेरपर्यंत चारा छावणी सुरळीत सुरू होती. मात्र, फेब्रुवारीपासून परीसरातील विहिरींनी तळ गाठल्याने जनावरांना पाणी मिळणे मुश्किल झाले आहे.

परीसरातील पाणी मिळेनासे झाल्याने अशोकबाबा भक्त परीवाराच्या आर्थीक मदतीतून मनमाड येथील टँकरने पाणी विकत घेऊन जनावरांची तहान भागवली जात होती.

मात्र, आता तेही शक्य होत नसल्याने पंचायत समितीमार्फत पाण्याचा टँकर सुरू करावा यासाठी संबंधित विभागाकडे मार्च मध्ये लेखी मागणी केली. मात्र, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवली.

पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग फक्त दुष्काळग्रस्त जनतेसाठी पाणीपुरवठा करू शकतो. जनावरांसाठी अशी कोणतीही तरतूद नसल्याचे अधिकारी सांगत असल्याची तक्रार छावणी संचालकानी केली आहे.

या चारा छावणीसाठी शासकीय मदतीतून चारा उपलब्ध करून द्यावा यासाठी गत सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र शासकीय अधिकारी दाद देत नसल्याने आता करावे तरी काय असा प्रश्न चारा छावणी संचालकांना पडला आहे.

शासकीय अनुदानित चारा छावणीसाठी परवानगी मिळावी. यासाठी पंचायत समिती तहसीलदार कार्यालय येवला उपविभागीय अधिकारी येवला यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, ही सर्व कार्यालये जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याने हा प्रश्न अजूनही निकाली निघू शकलेला नाही.

चारा छावणी सुरू करण्यासाठी कमीतकमी तीन हजार जनावरांची संख्या आवश्यक असल्याचे शासकीय अधिकारी सांगत आहेत अशी तक्रार चारा छावणी चालकाने केली आहे.

जर संबंधित विभागाने वेळीच पशुगणना केली असती, तर परिसरात यापेक्षा जास्त जनावरांची संख्या आढळली असती व याबाबतची वस्तूस्थिती शासनास कळवली असती तर आजपर्यंत चारा छावणी सुरू होऊन जनावरांना वेळेत चारा पाणी मिळाला असता असा आरोप गोशाळा चालक गणेश गोसावी यांनी केला आहे.

आता तरी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने जनावरांसाठी त्वरीत टँकर सुरू करावा किंवा 38 गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी गणेश गोसावी यांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!