करोना व्हायरस : १७८९ जणांची तपासणी महाराष्ट्रात एकही संशयित रुग्ण नाही

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी 

चीनच्या वूआंग शहरात लागण झालेल्या करोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे प्रवाशांची तपासणी केली जात आहे.

गेल्या सात दिवसांत १७८९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील सहा जण महाराष्ट्रातील होते. आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र मुंबईतील दोन प्रवाशांना घरी गेल्यानंतर सौम्य सर्दी आणि तापाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आज संध्याकाळी अजून एका रुग्णाला दाखल करण्यात आले. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

महिनाभरापूर्वी  करोना व्हायरसची लागण चीनमधल्या शहरात झाल्याने आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने जगभर खबरदारीचा इशारा दिला आहे. राज्यात केंद्र शासनाच्या मदतीने त्यासंदर्भात उपाययोजना राबविण्यात येत आहेत. करोना व्हायरस बाधित देशांतून आलेल्या प्रवाशांची तपासणी झाल्यानंतर पुढील २८ दिवस त्यांचा दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. अशा प्रवाशांना करोना सदृश आजाराची लक्षणे जाणवतात का, अशी विचारणा केली जाते.

या विषाणूच्या आजाराच्या रुग्ण निदानाची व्यवस्था राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) पुणे येथे करण्यात आली आहे. संशयित रुग्णांना भरती करण्यासाठी मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय व पुण्यामध्ये नायडू रुग्णालयात विलगीकरण उपचार सुविधा करण्यात आली आहे.

राज्यातील ज्या नागरिकांनी गेल्या १४ दिवसांत चीनच्या वुआन प्रांतात प्रवास केला असेल अशा नागरिकांना जर सर्दी, ताप जाणवत असेल तर त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात एकही संशयित रुग्ण सापडला नाही, असे स्पष्ट करतानाच नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

हा श्वसनसंस्थेशी निगडीत आजार असून सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होतो. निमोनिया, मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात. शिंकण्यातून, खोकल्यातून, हवेवाटे, विषाणू पसरतो. यावर खबरदारीचा उपाय म्हणून हात वारंवार धुणे. शिंकताना किंवा खोकताना नाकातोंडावर रुमाल धरणे. फळे, भाजीपाला न धुता खाऊ नये.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *