कसले काय! महाविद्यालयात लायसन्स अद्यापही मिळेना

वाघ अभियांत्रिकीत काही दिवस प्रयोग नंतर तोही बंदच

0
नाशिक । (प्रवीण खरे) | प्रादेशिक परिवहन विभागाकडून महाविद्यालयातच तरुणांना लायसन्स दिले जाणार असल्याची घोषणा एप्रिलमध्ये झाली.

सुरुवातीला नाशिकमधून केवळ के. के. वाघ अभियांत्रिकीने यासाठी तत्परता दाखवत सॉफ्टवेअरवर कामही सुरू केले. परंतु परीक्षेच्या कालावधीत तेथेही ही प्रक्रिया बंद पडली. दुर्दैवी बाब म्हणजे नाशिकमध्ये सध्याच्या घडीला एकाही महाविद्यालयात लायसन्स मिळत नाही.

परिवहन विभागाने मोठा गाजावाजा करत ही घोषणा केली. लायसन्ससाठी तासन्तास आरटीओत जाऊन थांबणे, चकरा मारणे हे टाळण्यासाठी महाविद्यालयात लायसन्स उपलब्ध करून देण्यावर चर्चा झाली.

त्यानुसार वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सूचनाही देण्यात आल्या. परंतु या सूचनांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेसाठी लागणारे मनुष्यबळ, सॉफ्टवेअर, परीक्षा वर्ग उपलब्ध करून देण्याची तयारी केवळ के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाने दाखवली. तेथे एप्रिल-मेदरम्यान काही दिवस लायसेन्स देणे सुरूही झाले, परंतु त्यानंतर ही प्रक्रिया बारगळली.

आरटीओकडेही मनुष्यबळाची कमतरता असल्याने तेदेखील अपेक्षित कर्मचारी पोहोचवू शकले नाहीत. त्यामुळे एकमेव महाविद्यालयात सुरू असलेली ही योजना बंद करण्यात आली. त्यानंतर अद्याप एकाही महाविद्यालयात ही योजना सुरू झालेली नाही.

महाविद्यालयात लायसेन्स मिळणार या बातमीनेच युवावर्गात आनंद होता. कारण अभ्यास, वर्ग, क्लासेस सांभाळून त्यांना महाविद्यालयातच ऑनलाईन परीक्षा देत लायसेन्स मिळणार होते. आरटीओकडून अधिकारी स्वत: महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्याच्या कागदपत्रांची पडताळणी करणार होते. परंतु नंतर ही प्रक्रिया काही काळ रखडली.

त्यातच अभियांत्रिकीच्या परीक्षा झाल्यानंतर के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात ही योजना सुरू होणे अपेक्षित असताना तसे घडलेच नाही. आरटीओनेदेखील यासाठी फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात लायसेन्स मिळणे हे स्वप्न राहणार की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयात माहिती घेतली असता महाविद्यालयात लायसेन्स मिळण्यासाठी कोणतीही हालचाल झाली नसल्याची माहिती समोर आली.

पुन्हा योजना सुरू होणार : सध्याच्या घडीला नाशिकमधील कोणत्याही महाविद्यालयात लायसेन्स दिले जात नाही. ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक संगणक तसेच साहित्य महाविद्यालयांनी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. केवळ के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाने सुरुवात केली होती. परंतु तेथेही लायसेन्स वाटप बंदच आहे. लवकरच याबाबत महाविद्यालयांना सूचीत करण्यात येईल.
राजेंद्र कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

LEAVE A REPLY

*