विशेष लेख : …मग ‘करोना’ला कसे हरवणार?

‘करोना’च्या महासंकटात सारे जग सापडले आहे. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर एक संदेश (पोस्ट) वाचनात आला. ‘सध्या सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत. कारण सर्व देव रुग्णालयात रुग्णसेवेत व्यस्त आहेत’.

संदेश खूपच अर्थपूर्ण आणि ‘करोना’च्या संकटकाळात रुग्णसेवेचे कर्तव्य बजावणा-या डॉक्टरांबद्दल कृतज्ञता प्रकट करणारा होता. ‘करोना’विरुद्धच्या लढाईतील या योद्धयांचे महत्त्व प्रकट करणारा आणि त्यांचे मनोबल उंचावणाराही आहे.

‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 25 मार्चपासून भारतात देशव्यापी ‘कुलुपबंदी’ (लॉकडाऊन) लागू करण्यात आली आहे. रेल्वेसेवा, विमानसेवा, सार्वजनिक बससेवा बंद करण्यात आली आहे.

मॉल, बाजारपेठा, चित्रपटगृहे, सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालये, शाळा-महाविद्यालये बंद आहेत. कंपन्या, मोठमोठे उद्योग-व्यवसाय, कारखानेसुद्धा बंद करण्यात आले आहेत. सर्वांनी घरातच थांबून सुरक्षित राहण्याचा सल्ला पंतप्रधान आणि महाराष्ट्रासह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तथापि लोकांना मात्र त्याचे गांभीर्य अजूनही समजलेले दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या गर्दीवरुन ते स्पष्ट होत आहे.

‘करोना’मुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होईल व आपल्यावर व आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल या निराधार भीतीपोटी लोक किराणा बाजार तसेच भाजीबाजारात मोठी गर्दी करीत आहेत. सिलिंडरसाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयापुढे लांबलचक रांगा लावत आहेत. गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.

तो टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचा व घरीच सुरक्षित राहण्याचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा सल्ला लोकांच्या पचनी पडलेला नाही. देशातील आणि महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा तसेच वैद्यकीय सुविधांच्या मर्यादा लक्षात घेऊन ‘करोना’च्या महामारीपासून वाचण्यासाठी घराचा उंबरा न ओलांडणे आणि संसर्ग टाळणे अगत्याचे आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री वारंवार लोकांना कानीकपाळी सांगत आहेत. लोकांचा बेशिस्तपणा आणि गर्दीमुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. दिवसेंदिवस तो आणखी वाढणार यात शंका नाही. ‘लॉकडाऊन’चा अर्थ समजून न घेता लोकांच्या झुंडीच्या झुंडी रस्तोरस्ती आणि बाजारपेठांमध्ये मुक्त आणि निर्भयपणे संचारताना दिसत आहेत.

पोलिसांनादेखील ही माणसे जुमानायला तयार नाहीत. इटली आणि स्पेनमधील लोकांनी ‘करोना’ संसर्ग रोखण्यासाठी घरातच थांबण्याचे तेथील सरकारांचे आवाहन धुडकावून लावले. त्याचा परिणाम त्या देशांना भोगावा लागत आहे. लोकांच्या बेजबाबदारपणाचा विपरित परिणाम म्हणून तेथील तेथील संसर्ग वाढून त्याचा उद्रेक झाला आहे.

अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयीन सेवक, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पाणीपुरवठा, स्वच्छता आदी सेवांतील सेवक आपापली सेवा नित्यनेमाने बजावून देशसेवा करीत आहेत.

त्यांच्यावरील ताण आणखी वाढू नये ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. सर्वांनी शासन आदेशाचे पालन करून आपापल्या कुटुंबासह घरात सुरक्षित राहणे आवश्यक आहे. मात्र त्याची जाणीव सुशिक्षित म्हणवणाऱ्यांनाही होऊ नये यासारखे दुर्दैव नाही.

चांगली सेवा मिळाली नाही किंवा हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याच्या कारणावरून डॉक्टरांना मारहाण करण्याचे किंवा रुग्णालयाची तोडफोड करण्याचे प्रकार अधून-मधून घडतात.

रुग्णाला बरे करणे हाच डॉक्टरांचा प्रयत्न असतो. ‘करोना’चे संकट ओढवले असताना डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत. तपासणीसाठी गेलेले डॉक्टर, वैद्यकीय सेवक आणि पोलिसांवर हल्ले केले जात आहेत. ‘करोना’च्या संकटातून वाचवणा-या देवदूतांवरच हल्ले का व्हावेत?

मध्य प्रदेशातील इंदूर, राजस्थानातील जयपूर, तसेच बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांत असे प्रकार घडले आहेत. देवमाणसांवरच हल्ले होऊ लागले तर ‘करोना’च्या तावडीतून जनतेची सुटका कोण करणार?

‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात २१ दिवसांचे ‘लॉकडाऊन’ जाहीर केले. त्यामुळे लाखो लोकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने बेरोजगार मजुरांचे तांडे शहरांकडून गावाकडे निघाले आहेत.

मजुरांच्या जेवणाची आणि राहाण्याची व्यवस्था राज्य सरकारांनी केली असली तरी आपापल्या गावाकडे जाण्यासाठी बेरोजगार मजूर आग्रही आहेत. याउलट शहरी भागातील शिकली-सवरलेले लोकांना भाजीपाल्याची चिंता सतावत आहे.

घरातून बाहेर पडू नका, रस्त्यांवर गर्दी करू नका, सुरक्षित अंतर ठेवा आदी सूचना पोलिसांकडून वारंवार केल्या जात आहेत. तरीही लोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

त्यामुळे नाईलाजाने अशा नाठाळांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना कठोर व्हावे लागत आहे. ‘लॉकडाऊन’ सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी लोकांचे घराबाहेर पडणे थांबत नाही. स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेपेक्षा त्यांना भाजी घेणे जास्त महत्त्वाचे वाटते.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील ‘मरकज’ प्रकरणानंतर देशातील ‘करोना’ने बाधितांची संख्या वाढली आहे. ‘लॉकडाऊन’द्वारे संसर्ग आटोक्यात ठेवण्याच्या सरकारी प्रयत्नांना त्यामुळे धक्का बसला आहे. हल्ला करण्यासाठी बाहेर ‘करोना’रुपी शत्रू दबा धरून बसला आहे. त्याला हरवण्यासाठी सर्वांनी घरात सुरक्षित बसणे आवश्यक आहे.

बहुतेक लोकांना संकटाचे गांभीर्य समजले आहे. ते घरातच थांबून सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करीत आहेत. काही जणांचा गाफिलपणामुळे संकट गंभीर होऊ शकते. ही बाब अशा नाठाळांना कधी कळणार? देशाचे नागरिक म्हणून ते आपली जबाबदारी आणि कर्तव्य केव्हा पार पाडणार? तसे न करता ‘करोना’ला कसे पराभूत करणार?

– एन. व्ही. निकाळे, वृत्तसंपादक, देशदूत, नाशिक


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *