श्रीगोंद्यातून पार्श्‍वनाथांची पुरातन पंचधातू मुर्तीची चोरी

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – शहरातील मनरोडवर असलेल्या जैन पार्श्‍वनाथ मंदिरातील चोवीसावे तिर्थकार पार्श्‍वनाथ यांची सुमारे 250 वर्षापुर्वीची पंचधातूची मुर्ती चोरीला गेली आहे. ही घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. मुर्ती चोरीला गेल्याची घटना मंदिराचे विश्‍वस्त यांनी पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळावर धाव घेत तपासाची सुत्रे वेगाने फिरवली. शहरासह तालुक्यात दोन महिण्यापासून चोरी, घरफोडी, दरोडा, खून अशा घटना वाढल्या असून पार्श्‍वनाथ मंदिरातील मुर्ती चोरीला गेल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.

शहरातील मेनरोड लगत पुरातन असे जैन मंदिर आहे. या मंदिरात दोन पंचधातूची मूर्ती असून काही मुर्ती संगमरवरी आहेत. पंचधातुच्या दोन मुर्ती पैकी आकाराने मोठी असलेली चोवीसावे तिर्थकार पार्श्‍वनाथ यांची मुर्ती चोरीला गेली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी प्रदीपकुमार बडजाते यांनी नऊ वाजणयाच्या सुमारास मंदिरात पुजा करुन शेजारी असलेल्या आपल्या घरी गेले. त्यानंतर त्यांची पत्नी ज्योती बडजाते या अर्धा तासानंतर म्हणजे साडेनऊ वाजेच्या सुमारास पूजापाठ करण्यासाठी मंदिरात आल्या असता त्यावेळी त्यांना मंदिरातील ओट्यावर पंचधातूची मुर्ती दिसली नाही. त्यांनी याबाबतची माहिती शेजार्‍यांना दिली. यानंतर संतोष सोनी यांनी मंदिरात येवून खात्री केली व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात माहिती दिली.

घटनेची माहिती कळताच पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी आसपसाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली मात्र सायंकाळ पर्यंत काहीही सापडू शकले नाही. विशेष म्हणजे हे मंदिर फक्त पुजेच्या वेळी आणि दिवसभरातील काही वेळीच उघडे असते. यामुळे मंदिरातील मूर्ती बाबतची सर्व माहिती असलेल्या इसमाने पाळत ठेवून ही चोरी केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुरातन देवी देवतांच्या मूर्ती आणि शिल्पाना अंतरराष्ट्रीय बाजारात लाखो आणि कोटी रूपयांचा भाव मिळतो. यासाठी चोरट्याने चोरी केली की मुर्ती चमकदार असल्याने सोन्याची समजून चोरी केली याबाबत पोलीस शोध घेत असून मुर्ती चोरी करणार्‍या इसमाला लवकरच अटक करू असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*