कोपरगाव शहरातील साईनगर भागात दिवसा जबरी चोरी

0

सोन्याच्या दागिन्यांसह आठ लाखांचा मुद्देमाल चोरला : आल्टो कारही पळविली

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – शहरातील साईनगर भागातील राकेश राजकुमार काले हे कुटुंबासह परगावी गेल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या दाराचे कडीकोयंडे तोडून 14 तोळे सोने, अर्धा किलो चांदी रोख अडीच लाखासह आठ लाखांची धाडसी चोरी केल्याची घटना घडली. शुभमनगर येथील बंगल्यासमोरून एक अल्टो कारही चोरीला गेली आहे.

यासंबंधी माहिती अशी की, साईनगर येथे राकेश राजकुमार काले व त्यांचे कुटुंब राहातात. ते शनिवारी संध्याकाळी मांगीतुंगी येथे दर्शनासाठी सहकुटुंब गेले. घरात कोणीच नव्हते. अज्ञात चोरट्यांनी बंद घराची टेहळणी करुन शनिवारी रात्री काले यांच्या घरातील दरवाजाचे कडीकोयंडे तोडले व घरात असलेल्या गोदरेज कपाटातील अन्य लाकडी कपाटातील वस्तूंची उचकापाचक करुन, घरातील 14 तोळे 4 ग्रॅम चे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी, रोख दोन लाख 55 हजार रुपये, दोन घड्याळ व इतर अशा सुमारे आठ लाखांच्या वस्तू चोरुन नेल्या.

या घटना घडत असताना शेजारी पाजारी लोकांना संशय आला नाही. परंतु दुपारी घरफोडी झाल्याचे समजताच काले यांना मोबाईलवरुन कळवण्यात आले. ते तातडीने कोपरगावात दुपारी 3 वाजता दाखल झाल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. तातडीने पोलीसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम चालू होते.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक पारेकर यांच्यो मार्गदर्शनाखाली सपोनि थोरात पुढील तपास करीत आहेत.
घटनास्थळापासून जवळच शुभमनगर भागातून अनंतराव चौधरी यांचे अल्टो वाहन शनिवारीच चोरीला गेले. या कारचा वरील घरफोडीसाठी चोरट्यांनी उपयोग केल्याचा संशय पोलीस बोलून दाखवत आहेत. अनंतराव चौधरी मुंबईला असतात. त्यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचे संभवत नाही परंतु त्यांची अल्टो कार चोरीला गेली आहे असे पोलिसांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*