Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भगवानबाबांनी वापरलेल्या बंदूक, तलवारीची चोरी

Share

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगड येथील संत भगवानबाबा यांनी वापरलेल्या व वस्तु संग्रहालयात ठेवलेल्या बंदुकीचा सांगाडा व एक जुनी तलवारीची बुधवारी रात्री चोरी झाली. गडावरून झालेल्या या चोरीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

गडाचे विश्वस्त अँड. जगन्नाथ बटुळे यांनी या बाबत पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे. चोरट्याने वस्तुसंग्रहालयाचा कडीकोयंडा तोडुन चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांनी तातडीने गडावर भेट देऊन पाहणी केली. भगवान गडावर संत भगवान बाबांनी वापरलेल्या विविध वस्तुंचे संग्रहालय दर्शनी भागात आहे.

बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी वस्तु संग्रहालयाचे कुलुप व कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. तेथील देखावा म्हणून लावलेल्या दोन बंदुकीचा सांगाडा (किंमत दीड हजार रुपये) व जुनी तलावर (किंमत तिनशे पन्नास रुपये) असा एक हाजर आठशे पन्नास रुपयांचा ऐवज चोरीस गेला.त्यातील एका बंदुकीचा सांगाडा अन्न छात्रालयासमोरील हनुमान मंदिरासमोर टाकुन दिला व दुसरा बंदुकीचा सांगाडा व एक तलवार चोरून नेली.

पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. गडावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता मध्यरात्री तिघेजण दुचाकीवरुन आले. त्यांनी वस्तुसंग्रहालयाचे दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केल्याचे फुटेज आहे. चोरांचे चेहरे मात्र स्पष्टपणे दिसू शकले नाहीत. वस्तु वस्तुसंग्रहालयात एकूण दोन रायफली होत्याय. चोरटे त्या दोन्हीही रायफल घेतल्या मात्र त्यातील एक अन्न छत्रालयासमोरील हनुमान मंदिरासमोर टाकून दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकास पाचारण केले. श्वानाने मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मार्ग दाखवला. गडाचे मठाधिपती महंत नामदेव शास्त्री सध्या गडावरच आहेत. या घटनेमुळे गडावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी भगवानगड असून कडक बंदोबस्त असूनही चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांची नजर चोरी केल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. तालुक्यातील मोहटादेवी, मढी, वृद्धेश्वर, हनुमान टाकळीसह शहरातील सर्वच मंदिराभोवती पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे. भगवानगडावर दिवसभर राज्यभरातून चौकशीसाठी भक्तांचे फोन येत होते. गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री महाराज यांची पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांनी भेट घेतली. पोलिस हवालदार सुरेश बाबर तपास करीत आहेत.

संत भगवान बाबांनी स्वतः वापरलेल्या बंदुकीचा सांगाडा व जुनी तलवार चोरीला गेल्याचे गुरुवारी सकाळी सोशल मिडियावरुन राज्यभर पसरले. भगवानबाबांनी वापरलेल्या वस्तुंची चोरी करण्याची हिंमत करणार्‍या तीनही चोरट्याला तातडीने अटक झाली पाहिजे, अशी मागणी भगवानबाबा भक्तांकडून केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!