देवगडनजीक दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना अटक

0
तिघे पळाले; हाती लागलेल्यांमध्ये श्रीरामपूर, पाथर्डीचे प्रत्येकी दोन तर एक गंगापूरचा 
देवगड फाटा (वार्ताहर) – श्रीक्षेत्र देवगड येथे दत्तजयंती उत्सवाच्या काळातच दरोडा टाकण्याच्या हेतूने थांबलेल्या पाच जणांना बंदोबस्तासाठी असलेल्या नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
याबाबत माहिती अशी, की पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र देवगड येथे प्रथमच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दोन अधिकारी व 20 कर्मचारी बंदोबस्तासाठी देण्यात आले होते.
देवगड येथे होणार्‍या चोरीच्या घटनांना आळा बसावा या उद्देशाने हेे पथक तैनात होते. पोलीस निरीक्षक दिलीप पवार व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे व उपनिरीक्षक सुधीर पाटील यांची दोन पथके बनविण्यात आली होती.
श्रीक्षेत्र देवगड येथे ही पथके बंदोबस्तावर असताना सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांना गप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुरमे ते मडकी रोडवर वळण रस्त्यावर काही अनोळखी इसम दबा धरून दरोडा टाकण्याच्या तयारीत बसले आहेत.

सदर हकीकत सहाय्यक पोलीस निरीक्षक गोर्डे यांनी तेथे हजर असलेले नेवाशाचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांना सांगितली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सदर ठिकाणी पोहचले.

तिथे तीन मोटारसायकलवर तीन इसम बसलेले आढळून आले. त्यांना पोलिसांची चाहुल लागताच ते पळून बसले तसेच रस्त्याच्या बाजूला दबा धरुन बसलेले त्यांचे साथीदार असलेले पाच इसमही पळू लागले असता स्थानिक गुन्हे शाख व स्थानिक पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी पाठलाग करुन त्यांना पकडले.

पकडलेल्यांची नावे कृष्णा भानुदास माठे (वय 38) रा. ओझर ता. गंगापूर जि. औरंगाबाद, मोहित विलास सौदागर (वय 25) रा. वॉर्ड नं. 2 श्रीरामपूर, सागर सुरेश कांबळे (वय 26) रा. रामनगर श्रीरामपूर, बजरंग रघुनाथ पवार (वय 24) रा. माणिकदौंडी ता. पाथर्डी व अशोक नवनाथ पवार (वय 26) रा. नाथनगर पाथर्डी अशी आहेत.

त्यांच्याकडून रोख रक्कम, दरोडा टाकण्याचे साहित्य तसेच घातक शस्त्रे मिळून आली. त्यांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा रजिस्टर फर्स्ट 564/17 भारतीय दंड विधान कलम 399, 402 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाईसाठी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, सुधीर पाटील, हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण, योगेश गोसावी, संभाजी कोतकर, पोलीस नाईक संदीप पवार, राहुल हुसळे, जयवंत तोडमल, विशाल गवांदेरे, सचिन अडबल, अशोक गुंजाळ, सुरेश वाबळे, गणेश मैड, किरण जाधव, बबन बेरड, संदीप आजबे यांनी सहभाग घेतला होता.

 

LEAVE A REPLY

*