दुचाकीची डीक्की तोडून चार लाखांची चोरी

नेवासा (शहर प्रतिनिधी) – बसस्थानकाजवळ उभ्या असलेल्या दुचाकीच्या डीक्कीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने चार लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला. भरदिवसा हमरस्त्यावर झालेल्या या धाडशी चोरीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर घटना भर दुपारी बसस्थानक परिसरामध्ये घडली.
येथील आसाराम नळघे यांनी मागील आठवड्यात त्यांच्या शेतातील चार लाख किंमतीचा ऊस व कापूस विकला होता. ते पैसे त्यांच्या मुलाच्या व त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यावर टाकले. दरम्यान उसने घेतलेले पैसे देण्यासाठी शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास नळघे यांनी मुलाच्या मार्केट यार्ड येथील बँक खात्यावरील एक लाख पाच हजार रुपये काढले व शहरातील बँकेत जाऊन त्यांच्या खात्यावरील तीन लाख दहा हजार रुपये काढले.

त्यातील चार लाख रुपये व बँकेचे पास बुक पिशवीत ठेवून त्यांच्या यामाहा कंपनीची गाडी क्रमांक  एम.एच.17 बीडब्लू 8460 च्या डिक्कीत ठेवले. व पंधरा हजार रुपये बसस्थानक जवळ असलेल्या नेवासा फाटा रस्त्यावरील कृषी केंद्र येथे द्यायचे असल्याने ते पैसे वर खिशात ठेवले होते. सदर कृषी केंद्र येथे जाऊन नळघे यांनी पैसे दिले. त्यानंतर इतरांना पैसे द्यायचे असल्याने नळघे हे गाडीकडे गेले असता त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांना डिक्कीचे कुलूप तोडून डिक्कीमध्ये असलेले सुमारे चार लाख रुपये घेवून पोबारा केला.

याप्रकरणी आसाराम यादव नळघे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदर घटनेनंतर पोलीस निरीक्षक रणजित डेरे व पथकाने तत्काळ शहरातील रस्त्यावरील दुकानामधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, मात्र चोरटे सापडले नाही. पुढील तपास हेड कोन्स्टेबल विठ्ठल गायकवाड हे करत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *