Friday, May 3, 2024
Homeराजकीय'पॅकेज'वरुन आव्हाड आणि फडणवीसांमध्ये रंगले वाक् युद्ध

‘पॅकेज’वरुन आव्हाड आणि फडणवीसांमध्ये रंगले वाक् युद्ध

मुंबई | Mumbai

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन इशारा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. या मुद्द्यावरून आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाक् युद्ध सुरू झालं आहे.

काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर फडणवीस यांनी वेगवेगळ्या देशांनी घोषित केलेल्या मदतीच्या पॅकेजबाबत ट्वीट करुन माहिती दिली होती.

त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे पॅकेज किंवा मदत ही तिथल्या केंद्र सरकारांनी केलेली आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून अशी टीका केली होती.

त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. याचं कारण महाराष्ट्रातील एकमेव सरकार आहे ज्यांनी कोणतीही मदत केलेली नाही. केंद्र सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज गेल्या वर्षभरात दिलं आहे. देशातील इतर राज्यांनीही पॅकेज दिलं आहे. फक्त महाराष्ट्राने एक पैशांचं पॅकेज तर दिलंच नाही पण त्याऐवजी लोकांचं वीज कनेक्शन कापणं, लोकांना त्रास देणं यावरच भर दिला आहे,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘मुख्यमंत्र्यांनी रुग्णसंख्या का वाढत आहे? महाराष्ट्रातच का वाढत आहे? काय उपाययोजना करत आहोत हे सांगण्याची आवश्यकता होती. नागपूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्यानंतर सरकार काय व्यवस्था करणार आहे? पुण्याला काय करणार आहे? किंवा राज्यातील इतर भागात संख्या वाढत असताना बेड मिळत नाही, व्यवस्था नाही याचं उत्तर द्यायला हवं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला,’ अशी टीका फडणवीसांनी केली होती.

फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पहिली लाट आली त्यावेळेस व्हेंटिलेटर, साधनसामग्री बंद केली आणि वीस लाख कोटी म्हणत फिरत आहेत. विस्मरणाचा रोग मला झालाय की तुम्हाला झालाय? असा सवाल त्यांनी केला. 20 लाख कोटींचा नक्की हिशोब समोर ठेवा मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही ते म्हणाले. कोण विरोधकांना दाबत आहे? कोरोना दाबायचा की विरोधकांना? लोक मरणाशी लढत आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारसोबत काम करायच्या ऐवजी सरकारच्या पायात पाय घालून पाडण्याचा विचार विरोधक करत असतील तर अर्थ नाही, असं आव्हाड म्हणाले. राज्य सरकारला एक लाख कोटी रुपयांची तूट आली आहे. महाराष्ट्र पहिल्यांदाच शून्यावर गेला आहे तो केंद्रामुळे गेलाय. वीस लाख कोटी मधील किती कोटी महाराष्ट्राच्या हातात आले हे जर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर मला विस्मरण झालं असेल तर माझ्या स्मरणात भर होईल, असंही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या