Photo Gallery : बागलाणमधील किकवारी खुर्द स्मार्ट बनले त्याची गोष्ट…

0
नाशिक : बागलाण तालुक्यात आदिवासी बहुल असलेल्या भागातील किकवारी खुर्द गावातील ग्रामस्थांनी सातत्यपुर्ण प्रयत्नांनी गाव कचराकुंडीमुक्त आणि हिरवेगार केले आहे. निसर्गाशी खऱ्या अर्थाने नाते जोडलेल्या या गावाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ‘स्मार्ट ग्राम’ योजनेअंतर्गत पारितोषिक मिळविले आहे.

सटाणापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेराशे लोकसंख्येच्या या गावात हजारो झाडे लावण्यात आली आहे. गावात प्रवेश करताच वनराईतील भटकंती करीत असल्याचा अनुभव मिळतो. अनेक पक्ष्यांचे आवाज आपले स्वागत करतात. पारंपरिक वाड्यांचे सौंदर्य पहावयास मिळते. वैयक्तिक घर असो वा सार्वजनिक इमारत, प्रत्येक ठिकाणी किमान एकतरी झाड लावलेले दिसते.

लोकसंख्येच्या कितीतरी पट झाडे गावाने जगविली आहेत. त्यात सीताफळ, डाळींब, आंबा, आवळा, चिंच, साग, लिंब, नारळ आदी विविध झाडांचा समावेश आहे. आतापर्यंत 125 हेक्टर पडीक जमिनीचे बागायत रुपांतर झाले आहे. गावात कुऱ्हाड आणि वनचराईबंदी अंमलात आणली आहे.  झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन आणि टँकरचा उपयोग करण्यात येतो.

गावाने ‘निर्मल ग्राम योजनेत’ यशस्वीपणे सहभाग नोंदविला. इथल्या प्रत्येक घरात शौचालय उभारण्यात आले आहे.  गावात उकीरडा किंवा कचराकुंडी शोधून दिसणार नाही. गावातील प्रत्येक रस्ता अगदी स्वच्छ दिसतो. प्रत्येक घरातून निघालेला कचरा गावात तयार करण्यात आलेला कचरा नॅडेप पद्धतीच्या कचरा डेपोत टाकण्यात येतो. डेपो भरल्यावर ट्रॅक्टरद्वारे गावाबाहेर तयार करण्यात आलेल्या खतनिर्मिती डेपोत कचरा टाकण्यात येतो. पावसाळ्यात कचऱ्यात पाणी मुरुन त्याचे खतात रुपांतर होते. हे खत शेतीसाठी आणि झाडांसाठी उपलब्ध करून दिले जाते.

गावात स्माशन परिसरात फुलझाडे व इतर वृक्षांची लागवड करून जागेचे पावित्र्य जपण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. ग्रामस्थांना केवळ हजार-दोन हजार रुपयात लग्नासाठी हिरवागार परिसर असलेला हॉल आणि भोजनगृह उपलब्ध करून देण्यात येते. प्लास्टिक निर्मुलन, बायोगॅसचा वापर,  घरसमोरील परसबागा, गुटखा विक्री बंदी, दारुबंदी अशा अनेक उपक्रमाद्वारे गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गावात आदिवासी बांधवांना शेळ्या पालनासाठी  स्वतंत्र व्यवस्था करून देण्यात आली आहे. शेळ्या घराजवळ बांधल्या जात नसल्याने आरोग्याच्या समस्या कमी झाल्या आहेत. अल्पभूधारकांना ग्रामपंचायतीकडील जमीन कराराने शेतीसाठी दिली जाते. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होण्याबरोबर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडली आहे. शाळेचा परिसरही हिरवागार आहे. अशा परिसराद्वारेच जणू विद्यार्थ्यांवर निसर्ग संवर्धनाचे संस्कार केले जातात. निसर्गाच्या सान्निध्यात ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

गावाने  भूमिगत बंधारे, माती नालाबांध, बंधारा दुरुस्ती, वनराई बंधारे, वनतळी आदींच्या माध्यमातून जलसंधारणाचे अनेक उपक्रम राबविले आहे. गावात पाणी शुद्धीकरणासाठी उपसरपंच केदाबापू काकुळते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ची यंत्रणा उभी केल्याने श्रम आणि खर्चात बचत झाली आहे. इस्राईल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक घरात समान पाणीपुरवठा करण्यात येतो. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास ग्रामस्थ उत्सुक असतात.

एकूणच कल्पकता, जाणिवा आणि परिश्रमाच्या बळावर गावात परिवर्तन घडविता येते हे किकवारी खुर्दच्या ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. एखाद्या पर्यटनस्थळाला लाजवेल अशा निसर्गरम्य परिसरात नव्या युगातील जाणिवा घेऊन इथले नागरिक आपले गाव अधिक ‘स्मार्ट’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

स्वच्छतेची सवय इथल्या प्रत्येक नागरिकाला जडली आहे. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा आनंद ग्रामस्थ घेतात. कचराकुंडीमुक्त गाव असल्याचा आम्हाला अभिमान आहे. नवे तंत्रज्ञान स्विकारुन गावाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न सर्व मिळून करणार आहोत.
                                                                     – केदाबापू काकुळते, उपसरपंच

LEAVE A REPLY

*