केंब्रिज शाळा प्रशासनाची मनमानी अखेर गुन्हा दाखल

0

इंदिरानगर (प्रतिनिधी):- इंदिरानगर येथील केंब्रिज इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासनाने मनमानी कारभाराचा कळस गाठला असून शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांचे दाखले घरपोहोच पाठवण्याच्या शाळा प्रशासनाच्या कृत्याच्या निषेध आंदोलनाने वेगळे वळण घेतले आहे.

प्रशासनाने लोकप्रतिनिधींशी अरेरावी केल्याने आमदार देवयानी फरांदे यांनी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश इंदिरानगर पोलिसांना दिल्याने शुक्रवारी रात्री शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वी फीन भरल्याचे कारण दाखवून शाळा व्यवस्थापनाने दीडशे विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने घरी पाठवले होते. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी पालकांच्या भावना लक्षत घेऊन सभापती शाहीन मिर्झा, नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ.दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, शाम बडोदे, यांनी शाळा व्यवस्थापनाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली. मात्र प्रशासनाकडून मिळालेल्या उडवाउडवीच्या उत्तरांनी संतप्त नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली.

मनपा आयुक्तांनीही शाळेला पत्र दिलेले असताना शाळेकडून चुकीच्या पद्धतीने कार्यवाही केली जात असल्याचे स्पष्ट करून चौकशीचे आदेश दिले. दरम्यान यावर समाधान न झाल्याने संतप्त पालकांनी आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांना माहिती दिली.

दोन्ही आमदार तातडीने शाळेत दाखल झाले असता व्यवस्थापनाने शाळेला कुलूप लावून घेतल्याचे निदर्शनास आले. आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी शाळा ट्रस्टी राहुल रामचंद्रन यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही अरेरावीची भाषा वापरल्याने आमदार फरांदे यांनी पोलिंसाकडे शाळेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.

दरम्यान आज पोलीस तपासात संस्थेचे विश्‍वस्त राहून रामचंद्रन व भारतीरामचंद्रन हे चिन्नईला गेल्याचे समोर आले. यामुळे शाळेचे मुख्याध्यापक सोमु नादेर यांना पोलीसाठाण्यात पाचारण करत त्याची चौकशी करण्यात आली. त्यांचे जाबाब नोंदवून घेत त्यांना प्रश्‍नावली देण्यात आली आहे.

आठ दिवसात ही प्रश्‍नावली भरून पोलीस ठाण्यास सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती इंदिरानगरचे पोलीस निरिक्षक फुलदास भोये यांनी दिली. दरम्यान आज दिवसभर पालक व विद्यार्थ्यांचे जाब जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.

प्रतिक्रिया
* कारवाई व्हावी*
शाळा प्रशासन हुकूमशाही मार्गाचा अवलंब करीत असून प्रशासनाची मुजोरी थांबवलीच पाहिजे. प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाविरोधात गुन्हे दाखल व्हायलाच हवे. *सतीश सोनवणे, नगरसेवक*

*फीसाठी वेठीस धरणे अन्याय्य*
शाळेच्या अशा निर्णयांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होणार आहे. फीसाठी त्यांच्या नैसर्गिक शिक्षण हक्कावर गदा येत असून याविरोधात कारवाई होणे आवश्यक आहे. *डॉ.दीपाली कुलकर्णी, नगरसेविका*

*कारवाईचा बडगा दाखवण्याची गरज*
शिक्षणाधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन न करणार्‍या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य वेठीस धरणार्‍या प्रशासनावर कारवाईचा बडगा उचललाच पाहिजे. *शाम बडोदे, नगरसेवक*

*आवाज उठवणारच…*
जनसामान्यांच्या हिताविरोधात कृती करणार्‍या प्रशासनाविरोधात आवाज उठवण्याची गरज असून या प्रश्‍नांची तड लागे पर्यंत आवाज उठवणारच… *सुप्रिया खोडे,नगरसेविका*

LEAVE A REPLY

*