वाळू लिलावाला अत्यल्प प्रतिसाद

२४ पैकी ६ ठिकाणांंचे लिलाव; दरात कपात करण्याची नामुष्की

0
नाशिक | दि. ७ प्रतिनिधी –प्रशासनाला सर्वाधिक उत्पन्न देणार्‍या वाळू विक्रीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असून व्यापार्‍यांनी वाळू लिलावाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. प्रशासनाने जाहीर केलेल्या २४ ठिकाणांच्या वाळू लिलावांपैकी अवघ्या ६ ठिकाणच्याच लिलावांना प्रतिसाद मिळाला. यातून प्रशासनाला २३ लाखांचा महसूल मिळाला.

गत ४-५ वर्षांपासून इ-टेंडरींग आणि इ-ऑक्शनमुळे वाळू लिलावास ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. तर शासनाच्या अटी-शर्ती, पर्यावरणासह किचकट परवानग्यांमुळे बहुतांशी व्यावसायिकांनी त्याकडे पाठच फिरवली आहे. दुसरीकडे या जाचक बाबींमुळे चोर्‍यांचे प्रमाण वाढले.

अवैध उपसा होणार्‍या ठिकाणांना ठेकेदारांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने शासनाचा महसूलही बुडाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात अवघ्या १५ ठिकाणांचाच लिलाव झाला. त्यातून १ कोटी २७ लाखांचा महसूल मिळाला. परंतु ठिय्यांची ठिकाणे मात्र ४० पेक्षा अधिक असतानाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.

तर दुसरीकडे रितसर वाळू विकत न घेता सर्रास वाळूचोरी सुरू आहे. प्रशासनाकडून कारवाईही सुरू आहे. ठेकेदार प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईला जुमानत नाहीत. याच कारवाईचा राग येऊन तलाठ्यांवर प्राणघातक हल्ल्याच्याही घटना घडल्याचे समोर आले.

त्याच पार्श्‍वभूमीवर आता जिल्ह्यातील २४ ठिकाणांचे वाळू लिलाव जाहीर करण्यात आले. मात्र २४ पैकी अवघ्या ६ वाळू ठिकाणांना ठेकेदारांनी बोली लावली. यात २३२७ ब्रास वाळू लिलावातून अवघा २३ लाख ७८ हजार ८८५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. त्यामुळे आता १८ ठिकाणांसाठी पुन्हा लिलाव घेण्यात येणार आहेत.

त्यामुळे आता शासकीय दरात कपात करून पुन्हा फेरलिलाव घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली आले.

LEAVE A REPLY

*