Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पॅथॉलॉजिस्टच्या डिजिटल स्वाक्षरीने दिलेले अहवाल अमान्य; तक्रार आल्यास राज्य वैद्यकीय परिषदेकडून चौकशी, कारवाईचे संकेत

Share

नाशिक । प्रतिनिधी

आरोग्यविषयक तपासण्या करणार्‍या प्रयोगशाळांशी संलग्न असलेल्या पॅथॉलॉजिस्टने डिजिटल स्वाक्षरी असलेले अहवाल देणे अमान्य असल्याचे राज्य वैद्यकीय परिषदेने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारचे डिजिटल स्वाक्षरीने अहवाल देणार्‍या पॅथॉलॉजिस्टविरोधात तक्रार आल्यास चौकशी आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे संकेत वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आले आहेत.
राज्यातील असंख्य प्रयोगशाळांमध्ये पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध नसून तेथे तंत्रज्ञांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यात काही पॅथॉलॉजिस्टविरोधात वैद्यकीय परिषदेने कारवाईदेखील केली आहे. मात्र यातून पळवाट काढत आता पॅथॉलॉजिस्टची डिजिटल स्वाक्षरी रुग्णांच्या तपासणी अहवालावर छापण्याची शक्कल प्रयोगशाळांकडून लढवली जात आहे.

परिणामी आता अनेक प्रयोगशाळांमध्ये पॅथॉलॉजिस्टची डिजिटल स्वाक्षरी असलेले अहवाल दिसू लागले आहेत. प्रयोगशाळेत पॅथॉलॉजिस्ट उपस्थित असूनही डिजिटल स्वाक्षरी करणे हे नैतिकतेला धरून नसल्यचे वैद्यकीय परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे. पॅथॉलॉजिस्ट प्रत्यक्ष प्रयोगशाळेत हजर असेल तर डिजिटल सहीची आवश्यकता का, असा प्रश्न उपस्थित करत राज्य वैद्यकीय परिषदेने कामाच्या ठिकाणापासून नजिकच्या प्रयोगशाळांमध्ये दिवसभरात सेवा देणे पॅथॉलॉजिस्टला शक्य आहे. परंतु लांबच्या अंतरावरील प्रयोगशाळांशी तो संलग्न असेल तर परिस्थिती संशयास्पद असल्याकडे लक्ष वेधले आहे.

यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये पॅथॉलॉजिस्ट दोन शहरांमधील प्रयोगशाळांशीदेखील संलग्न असल्याचे आढळले आहे. एका प्रयोगशाळेत दिवसभरात केल्या जाणार्‍या चाचण्यांच्या अहवालांवर स्वाक्षरी करणे पॅथॉलॉजिस्टना शक्य आहे. परंतु डिजिटल स्वाक्षरीच्या पर्यायातून रुग्णांची दिशाभूल आणि फसवणूक करण्याचे प्रकार घडत असतील तर ही बाब गंभीर मानावी लागेल. डिजिटल स्वाक्षरी करण्यास आक्षेप नाही, परंतु त्या प्रयोगशाळेविरोधात कोणी तक्रार केल्यास प्रत्यक्ष उपस्थित राहून डिजिटल स्वाक्षरी केल्याचे पॅथॉलॉजिस्टला सिद्ध करावे लागेल. अन्यथा त्याच्या अनुपस्थितीत अहवाल दिल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे राज्य वैद्यकीय परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

रुग्णांच्या तपासणी अहवालांवर डिजिटल स्वाक्षरी करणे चुकीचे नाही. काही प्रयोगशाळांमध्ये ऑनलाईन सुविधा असून त्यामध्ये काम करणे सोपे जाते. तेव्हा या पर्यायाला विरोध न करता याचा गैरवापर होणार नाही यावर आरोग्य परिषदेने कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासाठी सोनोग्राफी केंद्राप्रमाणे सर्व प्रयोगशाळा, त्यांच्याशी संलग्न असलेले पॅथॉलॉजिस्ट यांची नोंदणी करावी. त्यांची वारंवार तपासणी करावी, अशी भूमिका पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!