शहरात मालकांचीच संख्या जास्त फक्त साडेचार हजारच भाडेकरूंची नोंद!

0
नाशिक | दि.३० प्रतिनिधी- परराज्यातील गुन्हेगारांचे नाशिकमध्ये येऊन गुन्हे करण्याचे वाढते प्रमाण आणि दहशतवादी कारवाया या पार्श्‍वभूमीवर शहरातील भाडेकरूंची माहिती पोलिसांपाठोपाठ आता दहशतवादविरोधी पक्षकानेही महापालिकेकडून मागवली.
मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे शहरात केवळ ४ हजार ६४३ भाडेकरू असल्याची माहिती महापालिकेने एटीएसकडे सुपूर्द केली आहे. त्यामुळे पोलिसांपाठोपाठ पालिकेकडे भाडेकरूंची नोंदणी करण्यात नागरिक तत्पर नसल्याचे चित्र आहे.  शहरात अनेक घरमालकांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत.

परंतु तसे करताना संबंधित भाडेकरूंची माहिती घेण्याची तसदी अनेक घरमालकांनी घेतली नाही. बहुतांश घरमालक भाडेकरूकडे विचारपूस न करताच केवळ अपेक्षित भाडे मिळतेय म्हणून आपले घर भाडेतत्त्वावर देतात. यातूनच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कळत नकळत आसरा दिला गेल्यास तो गुन्हा ठरतो. दिवाळीच्या काळात पाथर्डी फाटा येथे एका घरातून पोलिसांनी गुन्हे करणार्‍या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले होते.

नाशिक शहराचा विस्तार वाढला असून पोलीस अकादमी, एचएएल, देवळाली लष्करी छावणी, हवाई प्रशिक्षण केंद्रासारखी संवेदनशील ठिकाणे नाशिकमध्ये असल्याने दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात लष्कर-ए-तोयबाने अगोदरही प्रयत्न केले असून बिलाल शेख या दहशतवाद्याला यापूर्वी अटकही करण्यात आली आहे.

त्यामुळे एटीएस अधिक सजग झाले असून त्यांनी शहरात राहणार्‍या भाडेकरूंची माहिती थेट पालिकेकडे विचारली. एटीएसने महापालिकेला पत्र पाठवून शहरातील भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महापालिकेने सहा विभागांकडून भाडेकरूंच्या नोंदीची माहिती मागवली होती. ही माहिती सहा विभागांकडून मुख्यालयाला प्राप्त झाली असून पालिकेच्या दप्तरी केवळ ४ हजार ६४३ भाडेकरूंची नोंद आढळून आली आहे.

त्यासंदर्भातील माहिती पालिकेडून एटीएसला देण्यात आली आहे. महापालिकेकडून घरात भाडेकरू राहत असल्यास अतिरिक्त कराची आकारणी केली जाते. त्यामुळे घरमालकाने भाडेकरू राहत असल्याची नोंद केल्यास त्याच्या घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ केली जाते. वाढत्या घरपट्टी व पाणीपट्टीमुळे शहरातील बहुतांश घरमालक महापालिकेकडे नोंदणीच करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेकडेही मोठ्या प्रमाणावर भाडेकरूंची नोंदणी होत नसल्याचे वास्तव आहे.

भाडेकरूची माहिती
विभाग संख्या
सातपूर ३६६
पंचवटी ५३६
नवीन नाशिक ७३५
नाशिकरोड ८४३
नाशिक पश्‍चिम ११८०
नाशिक पूर्व ९८३

LEAVE A REPLY

*