कांदाचाळींचे अनुदान वाढवून द्यावे : बनकर

नाशिक । प्रतिनिधी

देशात अग्रस्थानी कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिकची ओळख असली तरी अपूर्ण कांदाचाळींमुळे 42 लाख मेट्रीक टन कांदा उघड्यावर साठवला जात आहे. कांदाचाळींचे अनुदान वाढवून द्यावे, यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना साकडे घातले आहे.

देशात साधारणत: 7.60 लाख हेक्टरवर कांद्याचे पिक घेतले जाते. त्यापकी सुमारे 35 टक्के म्हणजेच 2.66 लाख हेक्टरवर कांदा पिकाची लागवड ही फक्त नाशिक जिल्ह्यात केली जाते. त्यापैकी 69 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी लाल कांद्याची साठवणूक करण्याची सुविधा नसल्यामुळे तो तातडीने बाजारात आणला जातो.

परिणामी, बाजारात मिळेल त्या किमतीला आपला कांदा विकण्याची वेळ शेतकर्यांवर ओढावते. साधारणत: 54 लाख मेट्रिक टन उन्हाळी कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून 56 हजार 386 कांदाचाळी उभारल्या आहेत. त्यांची साठवण क्षमता साधारणपणे 11.73 लाख मे.टन असल्याने जिल्ह्यात 42.27 लाख मे. टन कांदा उघड्यावर साठवला जातो, अन्यथा तत्काळ बाजारात आणला जातो. त्यामुळे शेतकर्यांना वाढीव अनुदान द्यावे, अशी मागणी बनकर यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

कांद्याचे भाव सातत्याने कोसळत असल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते. कांदा साठवण्यासाठी चाळ उपलब्ध नसल्याने कांदा विकण्याशिवाय पर्याय नसतो. कांदाचाळींची संख्या वाढवण्यासाठी अनुदान वाढवून देण्याची मागणी कृषीमंत्र्यांकडे केली आहे.

– संजय बनकर, सभापती (कृषी व पशुसवंर्धन)


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *