दीडशे वर्षाचे प्रदर्शन मांडणारे म्युझियम विचारधीन; जिल्हाधिकारी : 25 कोटींचा निधी उपलब्ध

दीडशे वर्षाचे प्रदर्शन मांडणारे म्युझियम विचारधीन; जिल्हाधिकारी : 25 कोटींचा निधी उपलब्ध

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा निर्मितीच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्ह्याचा वैविध्यपूर्ण इतिहासाच्या पट उलगडणारे म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी देखील म्युझियम उभारण्याबाबत सूचना दिली असून त्यासाठी 25 कोटी निधी देण्याची तर्यारी दर्शवली आहे.

ब्रिटिशांनी नाशिक जिल्हयाची सन 1870 मध्ये निर्मिती झाली. महसूलच्या दृष्टीकोनातून ही निर्मिती करण्यात आली होती. चालू वर्षात जिल्हा निर्मितीला 150 वर्ष पूर्ण झाले आहे. शतकोत्तर सुवर्णवर्षपूर्ती निमित्त जिल्हा प्रशासनाकडून पुढील काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, राजकीय, साहित्य, संस्कृती, औद्योगिक विकास, कुंभ नगरी, पर्यटन याबाबत माहिती देणारे प्रदर्शन व उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच, गत जानेवारी अखेर झालेल्या विभागीय आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी या उपक्रमासाठी 25 कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शवली.

तसेच, जिल्ह्याची सर्वांगिण माहितीपट उलगडणारे कायमस्वरुपी म्युझियम उभारावे, अशी देखील सूचना केली होती. राज्य शासन निधी देणार असल्याने जिल्ह्याचे नानाविविध पैलू उलगडणारे म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी देखील सकारात्मक आहे. पाश्चात्य देशाच्या धर्तीवर हे म्युझियम असावे, यासाठी प्राथमिक स्तरावर विचारमंथन सुरु आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्यास नाशिककरांना जागतिक दर्जाच्या म्युझियम सफरची भेट मिळू शकते.

जिल्ह्याचा दीडशे वर्षाचा पट उलगडणारे म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे. याबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांंसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहे. पाश्चात्य देशातील म्युझियमच्या धर्तीवर जिल्ह्याचा इतिहास मांडता येईल का, याबाबत चर्चा केली जाईल.

– सूरज मांंढरे, जिल्हाधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com