Type to search

Breaking News Featured दिवाळी विशेष - रिपोर्ताज नाशिक मुख्य बातम्या

वस्तुसंग्रहालय मानवी भूतकाळाचा आरसा

Share

ऐतिहासिक कलात्मक व शास्त्रीय मूल्यांची आणि महत्त्वाची वस्तू सुरक्षितपणे अभ्यासाकरिता वस्तूसंग्रहालयात जतन केल्या जातात. तसेच संग्रहालय एक अशी संस्था आहे ज्यात मानव आणि पर्यावरण यांचे परस्परावलंबन, नाते याचा शोध घेतला जातो. प्रचार तसेच प्रदर्शन केले जाते. ज्याचा उपयोग शिक्षण, अध्ययन, शोध, मनोरंजनासाठी केला जात असून संग्रहालय हे शैक्षणिक2 केंद्रदेखील आहे. वस्तुसंग्रहालय हे मनुष्याच्या भूतकाळाचा आरसा आहे. संग्रहालयात कोणत्या कोणत्या वस्तू प्रदर्शित असतात ते बघूया.

वस्तुसंग्रहालय असे ठिकाण आहे जिथे ऐतिहासिक कलात्मक व शास्त्रीय मूल्यांची आणि महत्त्वाच्या वस्तू सुरक्षितपणे अभ्यासाकरिता जतन केल्या जातात. तसेच संग्रहालय एक असे संस्थान आहे जे समाजाची सेवा आणि विकास आणि जनसामान्यांकरिता खुले केले जाते. ज्यात मानव आणि पर्यावरण यांचा वारसा संरक्षण करण्याकरिता त्याचा शोध, प्रचार तसेच प्रदर्शन केले जाते. ज्याचा उपयोग शिक्षण, अध्ययन, शोध, मनोरंजनासाठी केला जात असून संग्रहालय हे शैक्षणिक केंद्रदेखील आहे. वस्तुसंग्रहालय हे मनुष्याच्या भूतकाळाचा आरसा आहे. संग्रहालयात कोणत्या कोणत्या वस्तू प्रदर्शित असतात ते बघूया.

संग्रहालय कुठल्या ना कुठल्या रूपाने प्राचीन काळापासून स्थापन होताना दिसते. पाषाणमूर्ती, बौद्ध, जैन धर्म साहित्य, धर्मग्रंथ, जुनी भांडी इत्यादी कलाकृती व वस्तू मंदिरांना काही लोकांद्वारे भेट म्हणून दिल्या जात असे. या सर्व वस्तूंचा उपयोग केला जात असे व कालांतराने जुने झाल्यावर त्या तिथेच ठेवून दिल्या जात असे. हळूहळू अशा वस्तूंचा संग्रह होऊ लागला. त्यामुळे कालांतराने अशा वस्तूंचा संग्रह राजा किंवा समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींकडे होऊ लागला. त्यामुळे असा संग्रह मालक तथा नजीकच्या लोकांसाठी मर्यादित झाला असून तो जनसामान्यांपर्यंत नाही पोहोचला. याप्रकारे संग्रहालयाचा उल्लेख प्राचीन भारतीय इतिहास तथा साहित्यामध्ये उदा. कृष्ण धर्योत्तर पुराणमध्ये चित्रशाळाचा उल्लेख दिसतो. ज्यात चित्रांचा संग्रह केला जात असे. महाकाव्यामध्येदेखील चित्रशाळा आणि विश्वकर्मा मंदिरांचा उल्लेख दिसतो. हिंदू मंदिरांचे सचित्र पोथी लिपीबद्ध केल्या गेल्या. तसेच भारतीय राजांनी साहित्यक, धार्मिक विषयांवर चित्र बनवून त्याचा संग्रह केला आहे. अशा प्रकारे भारतात राजा, महाराजा तसेच बादशाह मुगल काळातदेखील आपल्या मौल्यवान व कलाकुसर अप्रतिम अशा गोष्टींचा समावेश संग्रह करून ठेवत असे.

भारतीय संग्रहालयाची स्थापना आणि विकास : हिंदू, मुगल आणि नंतर ब्रिटीश अशी भारतात विविध शासकांनी आपली सत्ता गाजवली. ब्रिटीश काळात संस्कृती, कला यांना संरक्षण मिळण्याबाबत प्रयत्न करण्यात आले. भारतातील कलाकृती, सांस्कृतिक धरोहर, वारसा बघून प्रभावित होऊन सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीद्वारे पुस्तक, हस्तपोथिया, मानचित्र, नाणी, चित्र, शिल्पचित्र इ. सर्व महत्त्वपूर्ण कलाकृती व पुरावशेषाचा संग्रह केला. एशियाटिक सोसायटीनंतर सन 1814 मध्ये भारतीय संग्रहालय, कलकत्ताची स्थापना करण्यात आली. ज्याला भारताचे पहिले संग्रहालय होण्याचा गौरव प्राप्त आहे. भारतीय सन 1851 मध्ये केंद्रीय संग्रहालय, मद्रास व मुंबई मधील ग्रॉट मेडिकल कॉलेजमध्ये एशियामधील प्रथम मेडिकल संग्रहालय स्थापन झाले. सन 1863 मध्ये उत्तर प्रदेश येथील पहिले संग्रहालय ज्याला वर्तमानमध्ये राज्य संग्रहालय, लखनौ या नावाने ओळखले जाते. सन 1865 मध्ये राजकीय संग्रहालय, म्हैसूर, सन 1860 मध्ये दिल्ली महानगरपालिका यांचे संग्रहालय सन 1874 मध्ये मथुरा संग्रहालय, सन 1887, 1888, 1890 आणि 1894 मध्ये त्रिपुरा, उदयपूर, भोपाल, जयपूर, राजकोट, पुणे, बडोदा, भावनगर आणि डिचनापल्ली इ. भारतातील शहरांमध्ये संग्रहालयाची स्थापना झाली. सन 1914 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मुंबई ज्याला आता छ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय या नावाने ओळखले जाते. सन 1920 भारत कला भवन, वाराणसी, 1929 मध्ये बॉटनीकल संग्रहालय, सन 1931 मध्ये इलाहाबाद संग्रहालय इत्यादी भारतभर विविध विषयांशी निगडीत संग्रहालयाची स्थापना झाली. देशभरात आज 1 हजारपेक्षा जास्त संग्रहालयांची स्थापना झाली आहे. आज प्रत्येक शहरात खासगी किंवा सरकारी संग्रहालय हे वेगवेगळ्या विषयांचे आपणास दिसते.

पुरावशेषांच्या संग्रहामध्ये पुरातत्त्वाचे योगदान : सन 1861 मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाची स्थापना झाली. तेव्हापासून पुरावशेषांच्या संग्रहाकरिता व अभ्यासाकरिता तसेच नवीन संशोधनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पुरातत्त्वाच्या माध्यमातून सिंधू-हडप्पा सभ्यताबाबतची माहिती संपूर्ण जगभरात समोर आली आहे.

सिंधू सभ्यतांशी संबंधित पुरातत्त्वीक स्थळे, हडप्पा, मोहंजोदाडो, कालीवंगा, लिथाल, कोटदिजी, मितायल, राखीगढी, रंगपूर, दायमाबाद, धौलाविश, आलमगीर इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले असून या स्थळी धातू शिल्प, पाषाण शिल्प, मृदमूर्ती, मृदभांडी, मडके, स्नानगृह, अन्नगृह, नाणी, मोहर, डॉकयार्ड (मराठी शब्द) देवी-देवतांच्या मूर्ती या सर्वांवरून सिंधू सभ्यतामधील धार्मिक, सांस्कृतिक, राजमौसिक, व्यापारीक व सामाजिक जीवनाबाबत सविस्तर माहिती मिळते. या प्राप्त झालेल्या कलाकृती व पुरावशेष यांना विविध संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्यावर आजपर्यंत विविध तज्ञ संशोधन मंडळ यांनी शोधकार्य केले आहे व करत आहेत. या प्रकारे देशातील अन्य भागातील प्राप्त अवशेषांचा संग्रह करून भारतीय संस्कृतीच्या संवर्धनामध्ये संग्रहालयाद्वारे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे.

अभिलेख, साहित्य यांचे संग्रहालय : प्राचीन काळापासून ते मध्यकाळापर्यंत वेळोवेळी अनेक साहित्यांची निर्मिती झाली. ज्यामुळे भारतीय समाज आणि संस्कृती यावर विपुल प्रकाश पडला आहे. विभिन्न पुराणकथा यांच्या माध्यमातून समाजातील गतिविधींची माहिती मिळते. तसेच धार्मिक आणि सामाजिक विविधाबाबत माहिती मिळते. तसेच परंपरा इ. भारतीयांनी वैदिक काळापासून ते मध्यकाळापर्यंत अनेक प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली. ज्यामध्ये इतिहास आणि संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे.

शिलालेख, ताम्रपट यांचे महत्त्व

देशातील अनेक संग्रहालयांमध्ये शिलालेख, अभिलेख बघायला मिळतात. प्राचीन काळी राजाला दानधर्म किंवा कोणतेही मोठे कार्य करताना ते कार्य पाषाणावर, भिंतीवर, गुहांमध्ये, स्तंभावर, ताम्रपटावर इत्यादीवर लिहिले जाई. यावरून आपणास इतिहासाची प्रामाणिक माहिती मिळते. हे लेख राज प्रशासन, दानधर्म, मंदिर निर्माण, प्रशस्ती इ. व्यक्त करते. काही शिलालेख, ताम्रपट हे जनकल्याणकारी कार्य आणि राज निर्देशनला व्यक्त करतात. यावरून आपणास राजांची नावे, वंश, गावांची, शहरांची नावे, सन, सामाजिक, धार्मिक, आर्थिक इत्यादीबाबतची माहिती मिळते. उदा. पांडवलेणी येथील नासिक्य नावाचा उल्लेख. अशोकाचे शिलालेख, सम्राट गुप्त-प्रयाग उल्लेख, कलिंगराज यांचा हाथीगुंफा अभिलेख यावरून हे स्पष्ट होते.

ताम्रनिधी, नाणे यांचे योगदान :

नाण्यांचे आर्थिक व सामाजिक इतिहास निर्माणमध्ये अभूतपूर्व योगदान आहे. या नाण्यांवरून आपणास तत्कालीन राजा व त्याचा शासन काळ ज्ञात होतो. तसेच त्यांच्या काळातील भाषा, लिपी, धर्म, समाज आणि आर्थिक स्थितीची माहिती मिळते. आहत नाणी सर्वात जुनी आहे. प्रत्येक शासन काळात वेगवेगळी नाणी तयार झाली असून ती आपले महत्त्व पटवून देण्यास समर्थ आहे. त्या काळातील समाज आणि धर्म यांची माहिती देत असते. उदा. नाशिकमधील नाणेशास्त्र संग्रहालय यात आपणास आहत नाणीपासून आधुनिक नाण्यांपर्यंत सर्व नाणी बघायला मिळतात. तसेच नाणी कशी तयार होत असे हेदेखील बघता येते.

आधुनिक इतिहास काळातील घटनांचा संग्रह : मुगलांच्या पतनानंतर भारतात ब्रिटिशांचे साम्राज्य आले. त्या गुलामगिरीतून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी भारतीयांनी आझादीची जंग छेडली. ज्यात सन 1857 चा उठाव विश्वविख्यात आहे. स्वातंत्र्यासाठी घडलेल्या घटना आणि दस्तऐवज संग्रहालयाद्वारे संग्रहित करण्यात आले आहेत. कला एवं संस्कृतीला ही विभिन्न संग्रहालयाद्वारे संग्रहित, संरक्षित केले जात आहे. या प्रकारे संग्रहालये देशाची संस्कृती, वारसा याला संकलित, संरक्षित आणि संवर्धनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. या प्रकारे विविध विषयांची स्वतंत्र संग्रहालये किंवा एकाच संग्रहालयात वर नमूद सर्व बाबी आपणास बघायला मिळतात.

महाराष्ट्रातील विविध नावाजलेली संग्राहालये : महाराष्ट्रात सरकारी, खासगी, निमशासकीय, ट्रस्ट इत्यादींची विविध संग्रहालये आहेत. यात पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई यांची महाराष्ट्रात 13 वस्तुसंग्रहालये असून ती नाशिक, नागपूर, औंध, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंदखेडराजा, माहूर, पैठण, तेर इत्यादी ठिकाणी आहेत.

त्यापैकी नाशिकमध्ये शासनाचे प्रादेशिक वस्तुसंग्रहालय सरकारवाडा येथे आहे. याव्यतिरिक्त नाशिकमध्ये अनेक संग्रहालयांचा समावेश असून त्यामध्ये नाणे संग्रहालय, अंजनेरी यात नाण्यांचा उदय, विकास यांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. 175 वर्षांची परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालयात शस्त्र संग्रहालय, गंगापूररोड येथे शिवकालीन ढाली-तलवारी व मराठा व मुगल काळातील शस्त्र पाहायला मिळतात. देवळाली येथील आर्टिलिटी सेंटरमधील संग्रहालयात युद्धातील विजयगाथा सांगणारे शस्त्र प्रदर्शित केले आहेत.

पेशवेकालीन सरकारवाडा

राज्य पुरातत्त्व विभाग यांचे नाशिक येथे प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. तसेच संग्रहालयाचे शासकीय, निमशासकीय, खासगी इ. प्रकारचे संग्रहालय आपणास पाहायला मिळतात. नाशिक हे धार्मिक, प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असून या ठिकाणी अश्मयुगापासून ते आधुनिक इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. नाशिक शहरास नासिक, नासिक्य व गुलशनाबाद अशा विविध नावांनी ओळखले जाते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या इतर प्रादेशिक विभागांपैकी नाशिक एका प्रादेशिक विभागाचे मुख्य केंद्र बनले. या प्रादेशिक विभागाला जशी धार्मिक परंपरा आहे तसाच पुरातत्त्वाचा अमूल्य ठेवाही लाभलेला आहे. पूर्वजांनी सोडलेला हा कलेचा अमूल्य ठेवा वारसा म्हणून जनतेला पाहायला मिळावा याकरिता प्रादेशिक वस्तुसंग्रहालय नाशिकला असावे, अशी सूचना पुढे आली. त्याची दखल राज्य शासनाने घेतली व 11 ऑक्टोबर 1985 रोजी राज्य शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या अधिपत्याखाली नाशिक येथे प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली. प्रथमत: सरकारवाड्यात प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाचा श्रीगणेशा झाला. बरेच वर्षे संग्रहालय या सरकारवाड्यामध्ये होते, परंतु सदर वास्तू विविध ठिकाणी मोडकळीस आल्यामुळे प्रथम सरकारवाड्याचे जतन व दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते. त्यामुळे संग्रहालयासाठी अन्यत्र जागा शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यानंतर सिडकोतील एका बंगल्यामध्ये संग्रहालय पुन्हा लोकांकरिता खुले करण्यात आले. तेथून पुढे फाळके स्मारकातील हॉल क्र. 3 मध्ये प्रादेशिक वस्तुसंग्रहालय स्थलांतर झाले. फाळके स्मारकात येणारा पर्यटकवर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथे संग्रहालय स्थलांतर करण्यात आले असून तेथे विविध दालने करण्यात आली व तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन 2005 ला उद्घाटनानंतर संग्रहालय पर्यटकांकरिता खुले करण्यात आले. सन 2005 ते नोव्हेंबर 2018 पर्यंत सदर संग्रहालय फाळके स्मारक येथे सुरू होते.

सरकारवाडा स्मारकाचे जतन :

सरकारवाडा मोडकळीस आला होता. त्याच्या दुरुस्तीचे व नूतनीकरणाचे काम सुरू आहे. प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, नाशिक हे दादासाहेब फाळके, अंबड, नाशिक येथून सरकारवाडा, नाशिक या राज्य संरक्षित स्मारकाच्या ठिकाणी हलवण्यात आले

हे  संग्रहालय 26 डिसेंबर 2018 रोजी उद्घाटनानंतर पर्यटकांकरिता खुले करण्यात आले आहे. या वस्तुसंग्रहालयात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर येथे सापडलेल्या आणि या पाच जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या वस्तू, पुरावशेष यांचे प्रदर्शन करण्यात आले आहे.

पाषाण शिल्प दालन

धरणगाव येथून प्रामुख्याने जैन मूर्ती की ज्या पद्मासनस्थ योगमुद्रेतील तीर्थकार, उभे तीर्थकार, बाहुबली आदींचा समावेश होता. तोंडापूर येथून काही पाषाण मूर्ती, गणपती आदी मूर्ती गोळा केल्या तसेच विंचूर येथील विंचूर संस्थानिकांकडून ठासणीच्या बंदुकी, तलवारी, ढाल व अन्य हत्यारे विनामूल्य देणगी स्वरुपात प्राप्त केल्या. अशाच स्वरुपाची हत्यारे मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे हत्यारांचे स्वतंत्र दालन उभे राहू शकले. संचालनालयानेदेखील काही मौल्यवान पाषाणातील मूर्ती संग्रहालयासाठी दिल्या. पूर्वी प्राप्त झालेल्या मूर्ती आणि या मूर्ती यांचे मिळून पाषाण मूर्तींचे स्वतंत्र दालन उभे राहिले. या पाषाण शिल्प दालनामध्ये जैन प्रतिमा, बुद्ध प्रतिमा तसेच हिंदू देवतांच्या (चामुंडा, गणपती, विष्णू, वासुदेव आदी पाषाण शिल्प मोठ्या दिमाखात उभी आहेत.

चित्रकला दालन

विंचूर येथून महान चित्रकार राजा रवी वर्मांच्या मूळ स्वरुपातील नसल्या तरी छापील स्वरुपातील मोजकी चित्रे विनामूल्य देणगी स्वरुपात प्राप्त झाली असून ती चित्रे आणि खुद्द नाशिक येथील निवासी यांच्याकडून कॅनव्हासवरील मोठे चित्र की जे महाभारतातील प्रसंगावर काढण्यात आले ते देणगी स्वरुपात प्राप्त झाले. राजा रवी वर्मा व त्यांची चित्रशैली नवीन पिढीला ज्ञात व्हावी हा उद्देश समोर ठेवून स्वतंत्र्य चित्रकला दालन निर्माण केले.

उत्खनन दालन

थाळनेर किल्ला (ता. शिरपूर, जि. धुळे) व गावात मध्ययुगीन मुघल राजा मजिक राजा आणि त्याची मुले नसीर व इप्तीकार यांचे वास्तव्य होते. म्हणून 1984-85 मध्ये किल्ल्याचे उत्खनन पुरातत्त्व विभागाने धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळाच्या सहकार्याने केले. त्यात आढळलेल्या पुरावशेषांचे स्वतंत्र्य दालन निर्माण केले.

नाणे दालन

याव्यतिरिक्त विविध प्रकारची मौल्यवान प्राचीन नाणी विनामूल्य देणगी स्वरुपात मिळाली. त्यामुळे प्राचीन नाण्यांचे दालन झाले. या नाण्यांमध्ये आहत नाणी, सातवाहन, नहपान, क्षत्रप, मुगल, ब्रिटीश तसेच विविध संस्थानांची नाणी येथे प्रदर्शित आहेत. या संग्रहालयात शिल्प दालन, धातुशिल्प दालन, छायाचित्रे व छयाचित्रे दालन, शस्त्रास्त्रे दालन सुरू असून जनतेसाठी खुले आहे. थाळनेर येथील उत्खननात आढळलेले अवशेष या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. संग्रहालयात असलेल्या कला वस्तू व पुरावशेष यांची संग्रहालयातून प्राप्त झालेल्या कला अवशेष व पुरावशेष नमुना यामध्ये नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. तसेच सरकारवाडा या वास्तूशी सुसंगत अशी भव्य व दिमाखदार वास्तू उभारण्याचे काम सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!