म्युनिसिपल सेना अध्यक्षपदाचा तिढा कायम

आजच्या बैठकीत एकमत नाही; आता वाद पक्षप्रमुखांच्या कोर्टात

0
नाशिक | दि.२६ प्रतिनिधी- नाशिक महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून सुरू झालेला वाद कार्यकारिणी बैठकीत संपुष्टात येईल असे शिवसेनेकडून सांगण्यात आल्यानंतर आजच्या कार्यकारिणी बैठकीत अध्यक्षपदावर एकमत झालेच नाही. परिणामी संघटनेतील अध्यक्षपदाचा तिढा कायम राहिला असून आता या वादावर पक्षप्रमुख निर्णय घेतील, असे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेतील संघटनेच्या कार्यालयात आज दुपारी कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष ऍड. शिवाजी सहाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मात्र बैठकीच्या प्रारंभी सेनेच्या पदाधिकार्‍यांकडून गटनेते कार्यालयात अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले सूर्यकांत लवटे व प्रवीण तिदमे यांच्यासह सहाणे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर कार्यकारिणीची बैठक होऊन यात पदाधिकार्‍यांकडून अध्यक्षपदासाठी कोणत्याही एका नावावर एकमत झाले नाही.

शेवटी सायंकाळी ऍड. सहाणे यांनी पत्रकारांना बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. यात सहाणे यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगत संघटनेच्या घटनेत अध्यक्ष हा नगरसेवक असावा अशी तरतूद नाही. मात्र सभागृहात कर्मचार्‍यांचे प्रश्‍न मांडावेत व त्यांची सोडवणूक करावी अशा अलिखित नियमाने नंतर अध्यक्षांची निवड केली गेली. आता आमच्यातील वाद मिटला असून जे काही घडले ते व्हायला नको होते. ही संघटना शिवसेनेची अंगिकृत संघटना असून या वादावर पडदा पडला असून आपला राजीनामा तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी आपण केल्याचे सहाणे यांनी सांगितले.
अध्यक्षपदासाठी आता सूर्यकांत लवटे, प्रवीण तिदमे, सत्यभामा गाडेकर, प्रकाश बोराडे व प्रशांत दिवे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या नावावर आजच्या बैठकीत चर्चा झाली, मात्र एकमत झाले नाही, अशी माहिती सहाणे यांनी दिली. आता यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ८-१० दिवसांत भेट घेतली जाणार असून हा निर्णय पक्षप्रमुखांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय होईपर्यंत आपल्याकडेच अध्यक्षपदाची जबाबदारी ठेवण्यात आली असून ही मुदत संपल्यानंतर आपला राजीनामा ग्राह्य धरावा, असेही पक्षनेत्यांना आपण सांगितल्याचे सहाणे यांनी सांगितले.

आता घोलप अध्यक्ष नाही : क्षीरसागर
माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आपणच संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष असून आजपर्यंत जे काही अध्यक्ष झाले ते हंगामी होते, असे सांगितले. त्याचे काय? यावर संघटनेचे उपाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर म्हणाले, अजून सहाणे यांचा राजीनामा कार्यकारिणीने संमत केलेला नाही. त्यामुळे आमच्या कार्यकारिणीच्या दृष्टीने अजून सहाणे हेच अध्यक्ष आहेत. तर घोलप आता संघटनेचे अध्यक्ष नाहीत. ते आमचे नेते असून नेते म्हणून कार्यालयात येऊन अध्यक्षांच्या खर्चीवर बसू शकतात, असेही क्षीरसागर यांनी पत्रकारांना सांगितले.

बैठकीनंतर लवटे, तिदमे निघून गेले
आजच्या बैठकीनंतर अध्यक्ष सहाणे यांनी पत्रकारांना माहिती देताना आमच्यातील वाद मिटल्याचे सांगितले. मात्र याप्रसंगी लवटे उपस्थित नव्हते. प्रवीण तिदमे उपस्थित होते. मात्र पत्रकारांनी काही प्रश्‍न पदाधिकार्‍यांना विचारल्यानंतर तिदमे येथून बाहेर पडल्यानंतर ते परत आलेच नाही. त्यामुळे अध्यक्षपदाचा वाद कायम असल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

*