Friday, May 3, 2024
HomeUncategorizedअन्नाच्या कणा-कणांचे महत्त्व जपावे!

अन्नाच्या कणा-कणांचे महत्त्व जपावे!

प्रा.डॉ.पी.एस.लोहार

संयुक्त राष्ट्रसंघाने 16 ऑक्टोबर 1945 रोजी रोममध्ये अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना केली. उपासमारीला संबोधित करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता फैलावण्यासाठी सन 1980 पासून 16 ऑक्टोबरला ’जागतिक अन्न दिवस’ साजरा करण्याचे सुरू केले गेले.

- Advertisement -

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. पण अजूनही आपल्या देशात असे लोकं आहेत ज्यांना दोन वेळचं जेवणंही मिळत नाही.

कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात अन्नसमस्येस गेली अनेक दशके तोंड द्यावे लागत आहे. अन्नाच्या मर्यादित साठ्याकडे पाहता उत्पादन वाढविण्याची गरज वाटायला लागल्याने सरकारच्या ‘अधिक धान्य पिकवा’ या मोहिमेला 1943 च्या सुमारास चालना मिळाली. ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद हळुहळू शेतीतून व पर्यायाने जेवणाच्या ताटातुन बाद होत गेली. कडबा (चारा) कमी झाला म्हणून गाई म्हशी कमी झाल्या व दुधाच्या जागी भेसळीचे दूध आले. भुईमूग, तिळ जाऊन सोयाबीन आले त्यामुळे घाण्याच्या तेल ऐवजी रिफएन्ड तेल आले.

ऊस व इतर नगदी बागायती पिकांसाठी अमर्याद बोर विहिरी खोदल्या त्यामुळे पाण्याची पातळी खालावली. चार्‍या अभावी व ढेपच्या किंमती वाढल्याने गुरांची संख्या कमी झाली. शेणखताची कमतरता यामुळे जमीनीची पाणी धारण क्षमता आणि जमीनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाली व जमिनीचा कसही घालवला.पारंपरिक ज्ञानाच्या व पिकांच्या वाणाच्या जागी रासायनिक खतांवर अवलंबलेली आधुनिक शेती व हायब्रीड सिड्स तंत्रज्ञान आले.एकसुरी पीक पद्धती आल्याने शेतातली जैवविविधता झपाट्याने घटली. परजीवी सूक्ष्मजीव,बुरशी व किटकांची संख्या वाढली, वनस्पतींचे नवीन आजार अस्तित्वात आले त्यामुळे अन्नधान्य उत्पादनात घट झाली

जागतिक लोकसंख्या 1951 पासून दर वर्षी लोकसंख्या 80 लाखांनी वाढत आहे असे दिसते. 2050 सालापर्यंत लोकसंख्या 9.6 अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

दर दहा वर्षांत लोकसंख्या 6ङ4 टक्कयांनी पण धान्योत्पादन मात्र 2ङ3 टक्कयांनी वाढले. म्हणजे लोक संख्यावाढीचे प्रमाण धान्योत्पादन-वाढीच्या तिप्पट होते. म्हणजे दर वर्षी 50 लक्ष टन जादा धान्याची गरज आहे. परंतु सरासरीने प्रत्येकाला दर वर्षी गरजेइतके धान्य मिळेल, एवढे उत्पादन होत नाही.

वाढत्या लोकसंख्येचा शेतीवर पडणारा ताण,जागतिक तापमान वाढ, वारंवार पडणारी अवर्षणे, अनियमित पाऊस याच्याजोडीस स्वार्थी भांडवलदार, नफेखोर साठेबाज,वाढता प्रांतीय संघर्ष, राजकीय अस्थिरतेसोबत घातलेले शेतीउत्पादन, सदोष वितरण आणि किंमतीचा फरक यामुळे अन्नाची उपलब्धता व प्रत दिवसेंदिवस घसरत जात आहे.

अन्नाच्या कमतरता किंवा उपलब्धता नसल्याने आपल्या देशात दर मिनिटाला कुपोषणाने दोन बळी जातात अथवा भूकबळी ठरतात. घरात मोजकी माणसं असतानाही नको तितका स्वयंपाक करून रात्री अन्न फेकून देणे, बाहेरून जेवणाचे पार्सल्स मागवणे, लग्नसोहळ्यातील जेवणावळीचं स्वरुप बदलून बुफेनं घेतल्याने, ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतल्याने, हॉटेलमध्ये गेलं की घेतलेलं अन्न टाकून देणार्‍यांच्या संख्येत वाढ झाल्याने अन्नाची नासाडी होत आहे.

लग्नात वधू-वरांच्या डोक्यावर टाकलेल्या अक्षतांपैकी दहा टक्केच अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर पडतात. एका लग्नामध्ये सरासरी पाच किलो तांदूळ अक्षतासाठी वापरला जातो. त्यातील फक्त अर्धा किलो तांदूळ वधू-वरांच्या डोक्यावर पडतो. उर्वरित तांदूळ पायदळी तुडवला जातो. राज्यात सरासरी दीड लाख विवाह समारंभ होतात. सुमारे सहा लाख किलो तांदळाची म्हणजेच अन्नाची तथा ते पिकवण्यापासून तर आपल्यापर्यंत पोहचविण्यापर्यन्त खर्च झालेल्या ऊर्जेची नासाडी आहे.

जगातील सुमारे 17% लोकसंख्या उपाशीपोटी असून त्यातील बव्हंशी भारतासारख्या विकसनशील व इतर अविकसित राष्ट्रांत आहे. 16 ऑक्टोबर हा उत्सव दिवस न ठरता त्यावर अधिक गांभीर्याने विशेषत: भारतासारख्या भूकपीडित देशांनी बघावे, अशी जागतिक अन्न-कृषी संघटनेची अपेक्षा आहे.

अन्नाच्या प्रत्येक कणांचे महत्व जाणून कोणत्याही समारंभात भोजनप्रसंगी ताटात अन्न उष्टे टाकू नये हवं तेवढंच वाढून घ्यावे हा एक साधा नियम पाळल्याने, हॉटेल्समधलं उरलेलं अन्न भुकेल्या गरिबांना वाटल्याने, सरकार नामक व्यवस्था, एकंदरीत अन्नाच्या अर्थ व बाजारव्यवस्था यांची सांगड घातल्याने, अन्नाची नासाडी टाळण्यासाठी समाजसेवक आणि स्वयंसेवी संस्था जनजागृती केल्याने पिकवलेले, साठवलेले, शिजवलेलं अन्न वाया न जाता ते गरजू व्यक्तींच्या मुखात पडण्यास मदत होईल. अजुनही वेळ गेलेली नाही, अन्नाच्या प्रत्येक कणाचे महत्व जोपासून आपल्या व पुढच्या पिढीचे पालन, पोषण व संगोपन करू या.

(लेखक चोपडा महाविद्यालयातील विज्ञानाचे वरीष्ठ प्राध्यापक असून विद्यापीठात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या