दीपोत्सवास आजपासून प्रारंभ

0

नाशिक | दि. १५ प्रतिनिधी – अंध:कार घालवून जीवन प्रकाशमान करणार्‍या दिवाळी अर्थात दीपोत्सवाला उद्या सोमवारपासून वासुबारसने प्रारंभ होत आहे. दिवाळीच्या स्वागताची घरोघरी जय्यत तयारी झाली असून लहानथोर सज्ज झाले आहेत.

रविवारचा सुटीचा दिवस साधून नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने नाशिकमधील सर्व बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. मुख्य रस्त्यांवर माणसांची आणि वाहनांची एकच दाटी पाहावयास मिळाली.

दिवाळी हा आनंद, मांगल्य व समृद्धीचा उत्सव मानला जातो. लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरोघरची अंगणे रांगोळ्यांनी सजतात. आकाशकंदिल आणि पणत्या पेटवून प्रकाशाची पूजा बांधली जाते.

कृषिप्रधान भारतात दिवाळीतील वसुबारसला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सायंकाळी गाईची वासरासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही सवत्स धेनूची पूजा करण्याची परंपरा आहे.

दूध-दुपत्यासाठी तसेच शेतीसाठी होणारी गोधनाची मदत लक्षात घेऊन गोधनाची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

LEAVE A REPLY

*