Thursday, May 2, 2024
Homeराजकीयसरनाईकांविरोधातील ED कारवाईने राजकीय वातावरण तापलं

सरनाईकांविरोधातील ED कारवाईने राजकीय वातावरण तापलं

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचं घर व कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयानं (ED) छापे घातल्यानंतर आता राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेत्यांकडून या कारवाईच स्वागत केले जात असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या कारवाईचा निषेध केला जात आहे.

- Advertisement -

ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईकांवरील कारवाईसंबंधी विचारण्यता आलं असता ते म्हणाले की, “ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल.” ते सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

अशा संस्थांचा वापर राजकारणासाठीच केला जातो – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

प्रताप सरनाईक यांच्या घरात ईडीने शोधमोहीम सुरु केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अशा संस्थांचा वापर राजकारणासाठीच केला जातो,” असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केला. “भाजपशासित राज्यातील नेत्यांवर अशी कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. परंतु भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना त्रास होतो,” असंही थोरात म्हणाले.

शिवसेनेचे मुखिया सुद्धा असेच उद्योग करतात – किरीट सोमय्या

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावरील कारवाईचे स्वागत करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व थेट ठाकरे परिवारावर हल्लाबोल केला आहे. ‘प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या बेनामी असतील. त्यांचा कारभार व्यवस्थित नसेल. सरकारी पैसा किंवा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांनी वळवला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. सरनाईक यांच्याबद्दल मी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या,’ असा दावाही सोमय्या यांनी केला. ‘शिवसेनेचे मोठे मोठे नेते आणि त्यांचे मुखिया व त्यांचा परिवार असेच उद्योगधंदे करतात हे सर्वांना माहीत आहे,’ असा थेट आरोपही सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेचे मुंबई, ठाण्यातील अनेक नेते महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हफ्ते घेतात. त्यांच्यावर कारवाई व्हायला नको का?,’ असा प्रश्नही त्यांनी केला.

भाजपा हीन पातळीचं राजकारण करणारा पक्ष – सचिन सावंत

सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर झालेल्या कारवाईवर काँग्रेसनं भूमिका मांडत “गेल्या सहा वर्षात एकातरी भाजपा नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?,” असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. “विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपा असे घाणेरडे डाव खेळत आहे. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या ६ वर्षात भाजपा नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपावाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?”, असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

“भाजपा हीन पातळीचं राजकारण करणारा पक्ष आहे. लोकांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. ज्यांना निवडून दिलंय ते लोकशाहीवर घाला घालत आहेत. द्वेष बुद्धीने छापे टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. गेल्या ६ वर्षात एकाही भाजपा नेत्यावर ईडीने छापा का टाकला नाही? त्यांना का नोटीस नाही?”, असं सचिन सावंत म्हणाले. “सुशांतप्रकरणात ईडी कशी आली? त्याचा पैसा चोरीचा, मनी लाँड्रिंगचा होता का? भाजपाचा हा दांभिकपणा लपून राहिलेला नाही. भाजपा जेव्हा विरोधात होते, तेव्हा दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा, विजय गावित यांच्यावर घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आणि नंतर त्यांनाच गंगाजल टाकून पवित्र करुन भाजपामध्ये घेतलं”, असं म्हणत सावंत यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे.

प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत – नारायण राणे

भाजप खासदार नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हंटल आहे की, “कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचं नसतं. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ” असं नारायण राणे म्हणाले.

विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी संस्थांचा वापर – छगन भुजबळ

सरनाईकांविरोधातील ईडीने केलेल्या कारवाईनंतर भुजबळांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे. त्यांनी म्हंटल आहे की, “पाठीमागच्या काळात मी भाजपविरोधात बोललो तर माझ्या अंगावर केस टाकली. विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारसाहेबांना ईडीने नोटीस दिली. लोकांना आता माहिती झालंय की भाजपविरोधात कुणी बोललं तर त्यांना त्रास देण्यासाठी संस्थांचा वापर होतो. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून संस्थांचा वापर होतोय. अर्णव गोस्वामी प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण तसंच कंगनाच्या प्रकरणात सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपविरोधात जो आक्रमकपणे बोलतो त्याला विविध मार्गाने त्रास दिला जातो. सरनाईकांवरील कारवाईचा मला अंदाज होता. जसं वाटलं तसंच घडलं. भुजबळ भाजपविरोधात जास्त बोलले की छापेमारी आणि केसेस, पवारसाहेबांनी निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली तर नोटीस, अशी दडपशाही भाजपने केली. भाजपला जरी ही दडपशाही वाटत नसली तरी लोकशाहीच्या दृष्टीने ही दडपशाहीच आहे. भाजपच्या एकाही नेत्याला का बरं ईडीची नोटीस गेली नाही?”, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या