बंदीवानांचे मुले कारागृह आवारातच शिकणार बाराखडी

0
नाशिकरोड | दि. ३ प्रतिनिधी- आता कैद्यांची लहान मुलेही बाराखडी, कविता, सुंदर गीते शिकणार आहेत. राज्य शासनाचा महिला व बालकल्याण विकास विभाग आणि नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या मदतीने कारागृहाच्या आवारात अंगणवाडी सुरू झाली असून कारागृहाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्या हस्ते अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले.

उच्च न्यायालयाने कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिकरोड कारागृहाच्या आवारातील छोट्या इमारतीत अंगणवाडी सुरू झाली आहे. जेलरोड परिसरात असलेल्या पवारवाडीतील सेविका भारती पवार आणि भारती जाधव ह्या लहान मुलांना अनौपचारिक शिक्षण देणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी एक अशी अंगणवाडीची वेळ आहे. जेलमधून रांगेत ही मुले बाहेर पडतात व शाळा सुटल्यावर पुन्हा शिस्तीत जेलमध्ये आईकडे जातात. कैद्यांबरोबरच कारागृह कर्मचार्‍यांची मुलेही येथे शिकणार आहेत.
पुण्याच्या येरवड्यासह प्रमुख मध्यवर्ती कारागृहात अंगणवाडी सुरू झाल्या आहेत. महिला व बालविकास विभागाने कोर्टाच्या आदेशानुसार सरकारकडे प्रस्ताव पाठवला असला तरी अद्याप पूर्तता बाकी आहे. त्यामुळे अंगणवाडीत कर्मचारी नेमता येत नसल्याने परिसरातील अंगणवाडीचे कर्मचारी जेलच्या अंगणवाडीसाठी देण्यात आले आहेत. नाशिकरोड जेलच्या अंगणवाडीत मुलांसाठी खेळणी आहेत. आता हिरवळ व अन्य झाडे लावण्यात येणार आहेत. व्हरान्डा तयार करून शेड तयार केली जाणार आहे.
बालविकास प्रकल्पप्रमुख योगीता जोशींनी सांगितले की, कैद्यांच्या ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी आकार अभ्यासक्रमही सुरू केला जाणार आहे. त्यातून या मुलांच्या प्रशिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकास केला जाणार आहे. काही कारागृहात हा अभ्यासक्रम सुरु झाला आहे. अंगणवाडी सेविकाच हे प्रशिक्षण देणार आहेत. या मुलांना आरोग्य व अन्य सुविधाही दिल्या जाणार आहेत.
याप्रसंगी कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, उपअधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ तुरुंगाधिकारी एस.ए. गिते, बी.एऩ. मुलाणी, एन.वाय. गुजराथी, सोमय्या सय्यद, वामन निमजे, बालविकास प्रकल्प अधिकारी योगीता जोशी, मुख्य सेविका सुज्ञा खरे, बारती पवार, एस.पी. जाधव, नानाजी सावंत, भारती पवार, भारती जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*